सेवा संकल्प अभियानांतर्गत सर्वंकष आरोग्य प्रशिक्षण शिबिर संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सेवा संकल्प अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, करडी येथे सर्वंकष आरोग्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणादरम्यान नागरिकांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, माता व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, नियमित आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक जनजागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सेवा संकल्प अभियानचा उद्देश, आरोग्य सेवांचे सक्षमीकरण आणि प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्त्व याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात व कार्यक्षमतेत वाढ होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा, वेळेवर निदान, उपचार तसेच आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा यांना प्राधान्य देण्याचा संकल्प केला.जिल्हा प्रशिक्षण पथक, भंडारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिराचे नियोजन व आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.




Petrol Price




