इतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम : डॉ. विकास ढोमणे


- शिलालेख प्रदर्शनीचे उदघाटन
- तीन दिवस चालणार प्रदर्शनी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्रातील महत्वपूर्ण स्मारक व गडकिल्ल्यावरील इतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम असून भारतीय पूरातत्व विभागाने या शिलालेखावरील संवादाचा अभ्यास करुन तयार केलेली छायाचित्र प्रदर्शनी इतिहासाचा दुर्मिळ ठेवा आहे. विशेषत: अरबी व फारशी भाषेतील शिलालेख व त्याचा अनुवाद या विषयी या प्रदर्शनीत उत्तम छायाचित्र आहेत. ही प्रदर्शनी आर्वजून बघावी, अशीच असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी केले.
भारतीय पूरातत्व सर्वेक्षण पुरालेख शाखा नागपूर व जे.एम. पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्रातील महत्वपूर्ण स्मारकावर अरबी आणि फारशी शिलालेख यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनीच्या उदघाटन कार्यक्रमात डॉ. ढोमणे अध्यक्ष म्हणून बोलत होते. अरबी, फारशी शिलालेख छायाचित्र प्रदर्शनी व सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाचे  उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पूरालेख कार्यालयाचे सहाय्यक अधिक्षक मो. शहानवाज आलम, समन्वयक डॉ. कार्तिक पनीकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिध्दार्थ मेश्राम प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
पूरातन काळात संदेश देण्यासाठी शिलालेखाचा वापर केला जायचा. हे शिलालेख राष्ट्रीय स्मारक व किल्ले या ठिकाणी मोठया प्रमाणात पहायला मिळतात.  या शिलालेखावर अरबी आणि फारशी भाषेतील संदेश कोरले असायचे. या शिलालेखावरील भाषेचा पुरातत्व शिलालेख विभागाने अभ्यास करुन त्याची छायाचित्र प्रदर्शनी तयार केली ही प्रदर्शनी इतिहासाचा अनमोल ठेवा आहे, असे डॉ. ढोमणे यांनी सांगितले. राष्ट्रीय स्मारकांना पर्यटक म्हणून भेटी देतांना या शिलालेखांचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे सांगून डॉ. ढोमणे म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीचे अवलोकन करुन आपला इतिहास व भाषा समजून घ्यायला हवी.  विशेषत: इतिहास शाखेच्या विद्यार्थ्यांनी या विषयीच्या नोटस् आपल्या संदर्भासाठी ठेवाव्या.
शिलालेखावरील अरबी फारशी भाषेचा अभ्यास करुन तयार केलेली छायाचित्र प्रदर्शनी इतिहासाचा वारसा सांगणारी आहे. भाषेचा प्रभावी वापर या शिलालेखावर करण्यात आला. संवादाचे माध्यम म्हणून शिलालेख आजही अजरामर आहेत, असे रवी गिते यांनी सांगितले. शिलालेख हे भारताच्या उज्ज्वल परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असून पूरातत्व विभागाने या  छायाचित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून ही परंपरा समाजासमोर ठेवली आहे. ही अभिनंदनीय बाब आहे असे ते म्हणाले.
पूरातत्व विभागाने शिलालेखावरील  अरबी व फारशी भाषेचा   अभ्यास करुन  हे छायाचित्र प्रदर्शनी तयार केली आहे. या प्रदर्शनीत लावलेल्या छायाचित्राची व भाषेची सविस्तर माहिती प्रदर्शनामध्ये येणाऱ्या नागरिकांना देण्याची सोय केली आहे, असे शहानवाज आलम यांनी सांगितले. ही प्रदर्शनी १३ ते १५ ऑगस्ट सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत जे.एम. पटेल कॉलेजमध्ये सर्व नागरिकांना खुली असणार आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून देशाच्या व महाराष्ट्राच्या स्मारकांचा इतिहास लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केल्या गेला आहे.
जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या नवनियुक्त कार्यकारणींनी आज पदभार स्विकारला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिध्दार्थ मेश्राम यांनी केले. विद्यार्थ्यांनी नव्या कल्पना राबवाव्या यासाठी अभ्यास मंडळाचे व्यासपिठ असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.  Print


News - Bhandara | Posted : 2018-08-13


Related Photos