भंडारा जिल्ह्यात २०,९२२ शेतकऱ्यांना १३७.१९ कोटींची कर्जमाफी


- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, बँकनिहाय टप्प्याटप्प्याने निधी वितरणाला सुरुवात; ऐन हंगामात बळीराजाला मोठा दिलासा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २०,९२२ थकीत शेतकरी कर्जदारांना १३७.१९ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या संबंधित कर्ज खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आली असून, बँकनिहाय व टप्प्याटप्प्याने निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
या कर्जमुक्ती योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातील एकूण ३०,५९४ माहिती कर्जखात्यांची महाआयटीच्या पोर्टलवर नोंद करण्यात आली होती. संगणकीय पडताळणी आणि शासनाच्या निर्धारित निकषांनुसार छाननी केल्यानंतर यापैकी २५,३४७ लाभार्थी शेतकरी पात्र ठरले असून त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ देण्याचे काम वेगाने सुरू आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मोठा सहभाग -
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत आतापर्यंत तीन टप्प्यांत कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १,१०,०४५ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९.८४ कोटी रुपये, दुसऱ्या टप्प्यात ६,४६६ शेतकऱ्यांच्या खात्यात ४०.४१ कोटी रुपये, तर तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबर २०२६ रोजी ९१९ शेतकऱ्यांच्या खात्यात ६.४९ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत एकूण १८,४३० थकीत शेतकरी कर्जदारांना ११६.७३ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमार्फतही निधी वितरण -
कर्जमाफी योजनेचा लाभ केवळ सहकारी बँकांपुरता मर्यादित नसून राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमार्फतही पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये निधी जमा करण्यात येत आहे.या बँकांच्या पहिल्या टप्प्यात ६५१ शेतकऱ्यांच्या खात्यात ५.४२ कोटी रुपये, दुसऱ्या टप्प्यात ७३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ५.५६ कोटी रुपये, तर तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबर २०२६ रोजी १,१०५ शेतकऱ्यांच्या खात्यात ९.४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.यामुळे राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील पात्र शेतकऱ्यांनाही शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळत असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्येही टप्प्याटप्प्याने निधी जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन -
दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या लाभार्थी यादीमध्ये नाव असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण अर्थात ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांनी तातडीने जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेच्या निर्धारित निकषांनुसार आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी झाला असून, आगामी हंगामासाठी आर्थिक नियोजन करण्यास त्यांना मदत होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेमुळे ऐन शेती हंगामात बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.




Petrol Price




