बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा प्रभाव हैदराबादपर्यंत : विदर्भात मात्र पावसाची शक्यता नाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. ३ नोव्हेंबर रोजी दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव हैदराबादपर्यंत जाणवण्याची शक्यता असून, काही भागांत ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, विदर्भात पावसाची शक्यता नसून केवळ ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूरचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत या प्रणालीचे चक्रीवादळात, तर २ नोव्हेंबर रोजी तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ३ नोव्हेंबरच्या सकाळी नेल्लोर ते नरसापूरदरम्यान हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेशाची किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर, तर वाऱ्याच्या झोताचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशासह तेलंगणातील काही भागांवरही हवामानविषयक परिणाम जाणवू शकतात. हैदराबादपर्यंत त्याचा अप्रत्यक्ष प्रभाव पोहोचण्याची शक्यता असली तरी तेथील पाऊस आणि वाऱ्याची तीव्रता याबाबत परिस्थितीनुसार चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, विदर्भातील नागरिकांना दिलासा देणारी बाब म्हणजे चक्रीवादळामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे प्रा. चोपणे यांनी स्पष्ट केले. विदर्भात केवळ ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.




Petrol Price




