शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी माजी सभापती विश्वास भोवते यांना अटक : २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी


- प्रकृती गंभीर असल्याने नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
२०१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यांना अटक केली आहे. त्यांची २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
गडचिरोली जिल्हा परिषदेने २०१३ मध्ये २२० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. बदली प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे कळताच  २०१५ मध्ये तत्कालिन मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१५ पासून ७३ शिक्षकांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली. परंतु सर्वांचे बयाण नोंदविल्यानंतर पुन्हा हे प्रकरण थंडबस्त्यात ठेवण्यात आले होते. मात्र हा प्रकरण  शिक्षक आमदार नागो गाणार व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने उठवून धरल्यानंतर  शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक रुपेश शेडमाके, विजेंद्र उर्फ विजय सिंग, नचिकेत शिवणकर, प्रमोद चहारे, सुनील लोखंडे व विनोद अल्लेवार यांना अटक केली होती. त्यांच्यासोबतच  याच प्रकरणात जिल्हा परिषदेचे तत्कालिन समाजकल्याण सभापती विश्वास भोवते यांचे नाव पुढे आल्या नंतर त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र  न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर भोवते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर १८ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलिसांनी त्यांना अटक केली. माजी सभापती विश्वास भोवते यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची प्रकृतीव गंभीर असल्याने नागपुरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-20


Related Photos