‘गुगल प्लस’ पुढील महिन्यापासून बंद होणार, यूजरचा डेटा नष्ट करण्यास सुरुवात


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  ‘गुगल’ची लोकप्रिय सोशल नेटवर्किंग सेवा ‘गुगल प्लस’ पुढील महिन्यापासून बंद होणार आहे. त्यामुळे कंपनीतर्फे या प्लॅटफॉर्मवरील सर्व यूजरचा डेटा दोन एप्रिलपासून काढण्यास सुरुवात होणार आहे. ही सेवा बंद करणार असल्याची घोषणा ‘गुगल’तर्फे गेल्या वर्षीच करण्यात आली होती. त्याची तयारी म्हणून फेब्रुवारी २०१९पासूनच ‘गुगल प्लस’ची विविध फीचर्स ऑफलाइन करण्यास सुरुवात केली होती. आता कंपनीने यूजरचा डेटा नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर इंटरनेट अर्काइव्ह आणि अर्काइव्ह टीमने ‘गुगल प्लस’वरील सर्व सार्वजनिक पोस्ट साठवून ठेवण्याचे काम आरंभले आहे. 
ज्या यूजरना आपली माहिती आणि डेटा साठवून ठेवायचा नसेल, त्यांनी आपले ‘गुगल प्लस’चे अकाउंट नष्ट करावे, असे आवाहनही कंपनीतर्फे करण्यात आले आहे. ‘गुगल प्लस’वरील सर्वच माहिती अर्काइव्हमध्ये साठवून ठेवण्यात येणार नाही. मात्र, कोणत्याही प्रकारच्या खासगी पोस्ट आणि यापूर्वी नष्ट करण्यात आलेला गोपनीय स्वरूपाचा मजकूर साठवता येणार नसल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. या शिवाय ५०० पेक्षा अधिक प्रतिक्रिया असलेल्या पोस्टही अर्काइव्हमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाहीत. मात्र, फोटो आणि व्हिडिओ ‘लो रिझोल्युशन’मध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे. कंपनीच्या व्यतिरिक्त ज्यांना ‘गुगल प्लस’चा डेटा साठविण्याची इच्छा आहे, त्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे ‘गुगल प्लस’ची सेवा बंद करण्यात येणार असल्याबाबत कंपनीने खुलासा केला नसला, तरी एक सुरक्षाविषयक समस्या उद्‌भवल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती.   कंपनीच्या मते साइटवरील डेटा २ एप्रिल २०१९पासून हळूहळू का होईना हटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल. 

‘गुगल प्लस’चे अकाउंट नष्ट करण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. plus.google.com/downgrade या लिंकवर जीमेल अकाउंटचा आयडी आणि पासवर्ड टाकून ओपन करा. त्यानंतर ‘गुगल’ सेवा खंडित करण्याचा पर्याय दिसेल. त्यानंतर ‘गुगल प्लस’च्या पर्यायाची निवड करा. त्यानंतर एक विंडो उघडेल. त्यावर ‘आपण गुगल प्लस’चे खाते नष्ट करण्याच्या पर्यायाची निवड केली आहे,’ असे लिहिलेले दिसेल. तेथे तुमच्या ‘गुगल अकाउंट’चे सर्व तपशील दिसतील. त्यानंतर पब्लिक गुगल प्लस प्रोफाइल नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर सर्वात खाली असणाऱ्या जागी बरोबर अशी खुण करून ‘Delete Google +’चा पर्याय निवडावा. या सर्व प्रक्रियेनंतर ‘गुगल प्लस’चे अकाउंट नष्ट होईल आणि तसा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल.   Print


News - World | Posted : 2019-03-22


Related Photos