जिल्ह्यात २१ हजार ७४२ पदवीधर बजावणार


- आज नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक
- मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी रवाना
- सकाळी ८ ते ४ वेळेत होणार मतदान, यंत्रणा सज्ज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी २३ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रावर मतदान होणार असून सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजता पर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. जिल्ह्यातील २१ हजार ७४२ पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान केंद्रांमध्ये आष्टी येथे २ मतदान केंद्र, कारंजा 3, आर्वी ६, आंजी मोठी १, सेलू २, सिंदी रेल्वे १ सेवाग्राम १, वर्धा ११, पुलगाव २, देवळी २, समुद्रपूर २ व हिंगणघाट येथे ८ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी, मायक्रो ऑब्झर्व्हर अशा २५० च्यावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदान शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पोलिस अधिकारी व पोलिस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर जिल्ह्यातील २१ हजार ७४२ पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये १३ हजार ९९ पुरुष मतदार, ८ हजार ६४३ महिला मतदार असे एकुण २१ हजार ७४२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे.
निवडणूकच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानेही आवश्यक तयारी केली आहे. मतदान केंद्रांवर शांतता व सुव्यवस्था राखणे, मतदारांना निर्भय वातावरण उपलब्ध करुन देणे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडणे, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क राहणार आहे. मतदानासाठी प्रशासनाने पुर्ण तयारी केली असून मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्यादृष्टीने यंत्रणा सज्ज आहे.




Petrol Price




