महत्वाच्या बातम्या

 हिंदुस्थानी नौदलाच्या आठ अधिकाऱ्यांची कतारमधील मृत्युदंडाची शिक्षा रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : कतारने मृत्युदंड ठोठावलेल्या ८ हिंदुस्थानी माजी नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा तेथील अपील कोर्टाने कमी केली असून शिक्षेचे कैदेत रुपांतर करण्यात आले आहे. हेरगिरीच्या आरोपावरून या आठ जणांना गेल्या ऑक्टोबरमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.

या शिक्षेच्या विरोधात कोर्टात कुटुंबीयांच्या वतीने हिंदुस्थान सरकारकडून अपील दाखल करण्यात आले होते. दहारा ग्लोबल प्रकरणात शिक्षा कमी केल्याच्या कतार अपील कोर्टाने दिलेल्या निकालाची आम्ही नोंद घेतली आहे, असे परराष्ट्र खात्याने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे. कतारचे लष्कर आणि सुरक्षा संस्थांसाठी प्रशिक्षण व इतर सुविधा पुरवणाऱ्या दोहा येथील अल दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीससाठी काम करणाऱ्या या आठ जणांना ऑगस्ट, २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. कतारी प्रशासनाने त्यांच्यावरील आरोप जाहीर केले नसले तरी कतारच्या कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्सने त्यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये मृत्युदंड ठोठावला होता.

कतारमध्ये कैदेत असलेल्या आठ जणांपैकी कॅप्टन नवतेज गिल यांना नौदल अकादमीतून पदवीधारक होताना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले होते. तामीळनाडूतील वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्याबरोबरच कॅप्टन सौरभ वसिष्ट, कमांडर पुर्णेंदू तिवारी, अमित नागपाल, एस.के. गुप्ता, बी.के. वर्मा, सुगुनाकर पकाला आणि खलासी रागेश हे कतारच्या तुरुंगात आहेत.

अपील कोर्टात आज या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसमवेत कतारमधील हिंदुस्थानचे राजदूत आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यापुढेही राजनैतिक आणि कायदेशीर सहाय्य पुरवले जाईल. कतारी प्रशासनाकडे या प्रकरणी आम्ही चर्चा करतच राहू, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. निकालपत्र अद्याप मिळायचे असून पुढे काय करायचे हे ठरवण्यासाठी वकील आणि कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे मंत्रालयाने नमूद केले.

  Print


News - World
Related Photos