निवडणूक आयोगास खोटी माहिती दिल्याबद्दल भामरागडचे नगरसेवक रापेल्लीवार यांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
अपत्याचे प्रमाणपत्र गैरमार्गाने प्राप्त करणे व राज्य निवडणूक आयोगास खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी भामरागड च्या तहसीलदारांनी भामरागड नगर पंचायतीचे नगरसेवक हरीभाऊ संभाजी रापेल्लीवार यांच्याविरोधात भामरागड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी रापेल्लीवार यांना अटक केली आहे.
नगरसेवक रापेल्लीवार यांनी नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यासाठी प्रभाग क्रमांक १६ मधून ७ ऑक्टोबर २०१५ रोजी नामनिर्देशन भरले. यामध्ये अपत्यांची संख्या ७ ऑक्टोबर २०१५ रोजी दोन दर्शविली व १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या निरंक दाखविली आहे. नामनिर्देशनपत्रासह शपथपत्र सादर करताना २१ सप्टेंबर २००१ नंतर एकूण मुलांच्या संख्येत भर पडून ती दोनपेक्षा जास्त झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरेन, असे शपथपत्र सादर केले होते.
या प्रकरणात चौकशी केली असता जन्म प्रमाणत्र, दाखल खारीज रजिस्टरचा उतारा, आधारकार्ड मधील नोंदीनुसार हरीभाउ रापेल्लीवार यांची मुलगी पुर्वा हिचा जन्म ६ ऑक्टोबर २००२ रोजी झाला असल्याचे दिसून आले. मात्र रापेल्लीवार यांनी प्रकरण बोर्डावर घेवून पुर्वा हिचा जन्म प्रमाणपत्र २७ जानेवारी २०१२ असे अभिलेखावर सादर केले. यामध्ये पुर्वाची जन्मतारीख ६ ऑगस्ट २००१ अशी नमुद आहे. या प्रकरणात पुर्वाच्या नावाचे दोन जन्म प्रमाणपत्रावर दोन भिन्न जन्मतारखा नमुद असल्याचे निदर्शनास आले. यामुळे भामरागडच्या तहसीलदारांनी चौकशी करून १४ जानेवारी २०१९ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी ग्रामपंचायत इरकडुम्मे यांनी निर्गमित केलेल्या जन्म प्रमाणपत्रामध्ये जन्मतारखेची नोंद ८ ऑगस्ट २००१  रोजीची आहे. तसेच जन्म दिनांक ६ ऑगस्ट २००१ नमुद असलेले ग्रामपंचायत इरकडुम्मे येथील उपलब्ध असलेल्या नमुना क्रमांक ३ जन्म नोंदवही ची तपासणी केली असता सदर नोंद दिसून आली नाही. यामुळे नगरसेवक रापेल्लीवार यांनी तिसरे अपत्य पुर्वा हिचे जन्म प्रमाणपत्र २७ जानेवारी २०१२ हे अवैध मार्गाने प्राप्त करून घेतले व नामनिर्देशनपत्रात खरी माहिती लपवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची तक्रार तहसीलदारांनी दाखल केली. यामुळे आज १५ मार्च रोजी रापेल्लीवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos