महत्वाच्या बातम्या

 दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करा!


- प्रलंबित बोनससाठी शेतकरी संघटनांची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

- जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांचे शासनाकडे साकडे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला असून, यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तिरोडा तालुक्यात शेती हा बहुतांश शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय असल्याने त्यांची संपूर्ण उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. मात्र, वाढती महागाई आणि शेतीच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून जाहीर होणारा धानाचा बोनस शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरतो. मात्र, अद्यापही बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

सध्या परिसरात हलक्या धानाची कापणी आणि मळणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, अद्याप शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्यांना आपले धान विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. याचा फायदा घेत व्यापारी कमी दराने धान खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडे पैशांची चणचण असून, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना कवडीमोल दराने धान विकण्याची वेळ आली आहे.

शेतकरी वर्षभर शेतात राबून धानासह विविध पिकांचे उत्पादन घेतात. मात्र, बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि इतर शेतीविषयक साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर खर्चाचा ताळमेळ बसविणे कठीण झाले आहे. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी शासनाकडे शेतकऱ्यांचा प्रलंबित बोनस तातडीने मंजूर करून दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या कष्टाचा सन्मान राखणे आवश्यक आहे. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण साजरा करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन बोनसची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, असे पारधी यांनी म्हटले आहे

दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन दिवाळीपूर्वी बोनस देत त्यांची आर्थिक कोंडी दूर करावी. अन्यथा शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.





  Print






Related Photos