महत्वाच्या बातम्या

 लग्न झाले नाही म्हणून बलात्काराचा आरोप करणे चूक : उच्च न्यायालयाचा निर्वाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : एखादे नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही किंवा नात्यात कडवटपणा आला म्हणून एखाद्यावर बलात्काराचा आरोप करणे योग्य नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवून बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीची दोष मुक्तीची याचिका मान्य केली आहे. तक्रारदार महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीशी ओळख होऊन मैत्री झाली आणि पुढे प्रेमात रुपांतर झाले. लग्नाच्या खोट्या बहाण्याने आरोपीने प्रदीर्घ काळ आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला.

त्या विरोधात तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि पोलिसांनी आरोपीला 2016 रोजी अटक केली. त्या अटकेला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान देत दोषमुक्तीची याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. त्यावर न्यायमूर्ती भारत डांगरे यांच्या एकलपीठाने एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले . न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, आरोपी आणि तक्रारदार यांच्यात आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

तक्रारदार महिला जेव्हा प्रेमाच्या नात्यात आली तेव्हा, शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या सज्ञान होती. वयाच्या अशा टप्प्यावर होती जेथे तिला तिच्या कृत्यांची संपूर्ण जाणीव होती. त्यामुळे शारीरिक जवळीक ही काही वेळा मर्जीने तर काही वेळा मर्जी विरूद्ध होती. दोघांचे प्रेमसंबंध आठ वर्ष होते. निव्वळ लग्न या गैरसमजुतीपायी तिने शारीरिक संबंधांना परवानगी दिली असे म्हणता येणार नाही. इतक्या मोठ्या कालावधीच्या नात्यामुळे तिला शारीरिक संबंधाच्या परिणामांची जाणीव होती.

प्रत्येक वेळी लग्नाच्या वचनाखाली शारीरिक संबंध प्रस्थापित झाले असे म्हणता येणार नाही, असे न्या. भारती डांगरे यांनी आपल्या आदेशात नमूद केले. केवळ नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्यामळे आरोपीशी प्रत्येकवेळी शारीरिक संबंध तक्रारदार महिलेच्या इच्छेविरुद्ध आणि तिच्या संमती विना प्रस्थापित केले गेले, असे म्हणता येणार नाही. तसेच लग्नाच्या आश्वासनावर नव्हे तर तक्रारदार महिलेचे आरोपीवर प्रेम होते म्हणून शारीरिक संबंध अनेकदा ठेवण्यास तिने परवानगी दिली होती, असेही आदेशात नमूद करून न्यायालयाने आरोपीची याचिका मान्य केली.





  Print






News - Rajy




Related Photos