पिके करपली, शेतकरी संकटात : बल्लारपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पावसाने पाठ फिरवल्याने बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून, शेतशिवारातील पिके करपून शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. अशा परिस्थितीत बल्लारपूर तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर न करणे हा शेतकरी आणि शेतमजुरांवर अन्याय असल्याचा संताप व्यक्त करीत शहर विकास आघाडीने तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकांना आवश्यक पाणी मिळाले नाही. परिणामी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या रोजगारावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने केवळ शेतकऱ्यांचाच नव्हे, तर शेतमजुरांचाही विचार करून मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, जिवती आणि बल्लारपूर या तालुक्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. प्रत्यक्षात बल्लारपूर तालुक्यातील गावागावांत पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असताना तालुका दुष्काळग्रस्त यादीत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत थुलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले. बल्लारपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच शेतीतील कामे घटल्याने रोजगारापासून वंचित झालेल्या शेतमजुरांनाही शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी भारत थुलकर, धर्मेंद्र गायकवाड, अशोक पाटील, वाजीद खान, आसीफ शेख, शरद वानखेडे, सरफराज शेख, सम्राट थुलकर, नरेंद्र हिरे, रवी वनकर आदी उपस्थित होते.




Petrol Price




