सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेबाबत नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


- वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा आरोप; गोरगरीब रुग्णांना बाहेर रेफर केल्याने आर्थिक भुर्दंड
- दहा दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षामुळे गोरगरीब रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. साध्या स्वरूपाच्या आजारांवरही रुग्णांना ग्रामीण रुग्णालयातून बाहेरील रुग्णालयात रेफर करण्यात येत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सिरोंचा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना तहसील कार्यालय, सिरोंचा यांच्या मार्फत निवेदन सादर करून ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा सुरळीत करण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाम भाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात ग्रामीण रुग्णालयातील कथित निष्काळजीपणा व दुर्लक्षाची चौकशी करून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना रुग्णालयातच आवश्यक उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सिरोंचा परिसर हा दुर्गम व ग्रामीण भाग असून, येथील अनेक नागरिक आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थितीत जीवन जगतात. अशा परिस्थितीत किरकोळ अथवा साध्या आजारांसाठीही रुग्णांना बाहेरील रुग्णालयात पाठविले जात असल्यास त्यांना प्रवास, उपचार, औषधे तसेच इतर खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचा योग्य वापर करून नागरिकांना स्थानिक पातळीवरच आरोग्य सेवा मिळावी, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरपंचायतचे नगरसेवक रणजीत गागापुरपू, नरेश अलोने व इम्तियाज खान सामाजिक कार्यकर्ते अफरोज सैय्यद व सिद्दिक भाई, तसेच रमेश बत्तूला, सुरेश पडीगेला, तौसिफ खान, शाहरुख शेख, रमेश तोकला, पत्रकार एम.डी. इरफान, पत्रकार जाकीर अली, बबलू खान, डॉ. सुगरवार, नारायण शनिगारापू यांच्यासह दुर्गम भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहा दिवसांची मुदत; अन्यथा उपोषणाचा इशारा -
ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. निवेदनावर दहा दिवसांच्या आत योग्य ती कारवाई न झाल्यास उपोषणास बसून सिरोंचा परिसरातील आरोग्याचा प्रश्न राज्य सरकारपर्यंत नेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवेबाबत करण्यात आलेल्या या तक्रारींची प्रशासनाकडून चौकशी होऊन नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होते का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




