महत्वाच्या बातम्या

 दारूच्या काळ्या धंद्यावर एलसीबी पोलिसांचा घाव : भिसी मार्गावर ७.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध दारूच्या वाहतुकीतून सुरू असलेल्या काळ्या धंद्याला स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार धक्का दिला. भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरेड-भिसी मार्गावरील जेबी हॉटेलजवळ विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत विदेशी दारूसह कार असा तब्बल ७ लाख ५१ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

१८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पथकाने उमरेड-भिसी मार्गावर सापळा रचला. संशयित Ford Ecosport कार क्रमांक GJ-15-CD-3292 पोलिसांच्या नजरेत येताच पथकाने कारवाई करत वाहनाची झडती घेतली.

झडतीदरम्यान कारमध्ये रॉयल स्टॅग क्लासिक व्हिस्कीच्या दोन लिटर क्षमतेच्या २१९ बाटल्या आढळून आल्या. या विदेशी दारूची किंमत २ लाख ५१ हजार ८५० रुपये आहे. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे ५ लाख रुपये किमतीची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यामुळे या कारवाईत एकूण ७ लाख ५१ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

या प्रकरणी मुकेश उर्फ मोनु मदनलाल विश्वकर्मा ३१ वर्षे रा. समतानगर, वर्धा आणि आदर्श अशोक पाटील २२ वर्षे रा. तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर प्रशांत, रा. अहेरी, जि. गडचिरोली हा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

या कारवाईनंतर अवैध दारू वाहतुकीच्या मार्गावर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक नजर ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जप्त दारू नेमकी कुठून आणली जात होती, ती कुठे पोहोचवली जाणार होती आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणी भिसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिसी पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos