लाखनी येथील एम.डी.एन. फ्युचर इंग्लिश स्कूलमध्ये रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना नेमबाजी या क्रीडा प्रकारात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे आणि त्यांना जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, या उद्देशाने लाखनी येथील एम.डी.एन. फ्युचर इंग्लिश स्कूलमध्ये रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून खेळाडूंना रायफल शूटिंगमधील तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना नेमबाजीच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी उपलब्ध होणार असून, उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी लाखनीच्या तहसीलदार शीतल घावटे, पोलीस निरीक्षक आशीष गजभिये, विस्तार अधिकारी सुभाष बावनकुळे, प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड, राष्ट्रीय हॉकी संघाचे प्रशिक्षक प्रतीक लाडे, एम.डी.एन. फ्युचर स्कूलचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक गिरहेपुंजे, संचालिका डॉ. रंजू पाल गिरेपुंजे, प्राचार्य डॉ. राजेश निनावे, डॉ. के. आर. कॉलेज ऑफ फार्मसीचे उपप्राचार्य सचिन नागदेवे, विभागप्रमुख नारायण गैधानी तसेच रायफल शूटिंग प्रशिक्षक सुभेदार मेजर ऋषी वंजारी यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक क्रीडा प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे भंडारा जिल्ह्यातील नेमबाजी क्रीडा प्रकाराच्या विकासाला चालना मिळेल आणि उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य विकसित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी यावेळी व्यक्त केला.




Petrol Price




