महत्वाच्या बातम्या

 आरमोरी येथे गुरांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर एलसीबीचा छापा : १९.६० लाखांचा मुद्देमाल जप्त


- ३२ जनावरांची अमानुषपणे वाहतूक; ६ गुरांचा तडफडून मृत्यू

- चार आरोपींना रंगेहात अटक; तिघे फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी (गडचिरोली) : आरमोरी पोलिसांच्या हद्दीतील ठाणेगाव टी-पॉइंटजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास धडक कारवाई करत कत्तलीसाठी केली जाणारी गुरांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ५५ हजार रुपये किमतीची २६ जिवंत आणि १ लाख २० हजार रुपये किमतीची ६ मृत अशी एकूण ३२ जनावरे तसेच दोन वाहने व मोबाईल फोन असा एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी आरमोरी भागात गस्तीवर होते. दरम्यान, आयशर वाहनातून गुरांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठाणेगाव टी-पॉइंटजवळ सापळा रचला.

काही वेळातच संशयास्पद वाटणाऱ्या आयशर वाहनाला (एम.एच. ०४ जीआर ३०८४) पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता पुढे नेऊन उभे केले आणि चालकासह दोघे जण पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून प्रणय जांभूळकर याला ताब्यात घेतले, तर चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. या वाहनाची पाहणी केली असता, त्यात आखूड दोरीने अत्यंत निर्दयतेने बांधलेली ३२ जनावरे आढळून आली. दमकोंड झाल्यामुळे त्यातील ६ जनावरांचा जागीच तडफडून मृत्यू झाला होता.

पायलट वाहन चालविणारे ३ आरोपी अटकेत -
आयशर वाहनाला पायलट (रेकी) करणाऱ्या स्विफ्ट (सी.जी. १० ए.एम. ८४१५) कारलाही पोलिसांनी अडवले. त्यातील तिघे जण पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शहेबाज सलाम शेख (३१, रा. गडचिरोली), शोहेब फारुख शेख (२७, रा. नागपूर), शेख आकिब नासीर शेख (२८, रा. नागपूर) व प्रणय समीर जांभूळकर (२०, रा. आंधळी, ता. कुरखेडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शहजाद शेख (रा. कुरखेडा), जमील कुरेशी (रा. गेवर्धा) आणि आयशर वाहनाचा अज्ञात चालक हे तिघे पसार झाले आहेत.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल -
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुधाकर दंडीकेवार यांच्या तक्रारीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कांबळे करत आहेत.





  Print






Related Photos