महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्राकरीता ८.५३ एकर जागा मंजूर


- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश

- विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच कौशल्य विकासावर भर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र आता चंद्रपुरात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी ८.५३ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या उपकेंद्राकरीता शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचे उपकेंद्र बल्लारपूर–चंद्रपूर मार्गावर तयार होत असताना आता गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्रही चंद्रपूरात होत आहे. शिक्षणासोबतच कौशल्य विकासावर वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा भर आहे. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे दोन विद्यापीठांचे उपकेंद्र जिल्ह्याला मिळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय भौगोलिक अंतरामुळे लांब पडत होते. यासंदर्भात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना डिसेंबर २०२२ मध्ये पत्र पाठवित गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात स्थापन करण्याबाबत सूचना केली होती. ना. मुनगंटीवार यांचे पत्र प्राप्त होताच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, गोंडवाना विद्यापीठ प्रशासन कामाला लागले. 

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ मोहल्ला येथील खुली जागा गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने उपलब्ध असल्याचे उपअधीक्षक, भुमी अभिलेख कार्यालय, चंद्रपूर यांनी नमूद केले आहे. त्यानुसार ही जागा गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुक्यांचा समावेश आहे. १३३ कॉलेजेच गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठे अंतर विद्यापीठात जाण्यासाठी पार करावे लागत होते. आता चंद्रपुरातच गोंडवाना विद्यापीठाचे केंद्र स्थापन होणार असल्याचे विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचणार आहे. स्थानिक पातळीवरच उपकेंद्र साकार होणार असल्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ना. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos