महत्वाच्या बातम्या

 अर्ध्या तासात घरी येतो म्हणाले अन् काळाने हिरावले : घुग्घुसच्या ट्रकचालकाचा भीषण अपघाती मृत्यू


विदर्भ न्यूज प्रतिनिधी 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दिवसभराची ड्युटी आटोपून घरी परतणाऱ्या घुग्घुस येथील ट्रकचालकाने रात्री मुलाला फोन करून, अर्ध्या तासात घरी पोहोचतो असे सांगितले. मुलगाही वडील घरी येण्याची वाट पाहत होता. मात्र, काही वेळातच महामार्गावरील भीषण अपघाताची बातमी आली आणि घरातील आनंदाचे वातावरण क्षणात शोकाकुल झाले. चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील उर्जाग्राम गेटजवळ आशीष बारसमोर झालेल्या अपघातात प्रदीप कुमार अमरनाथ सिंग (वय ४५, रा. घुग्घुस) यांचा मृत्यू झाला.

प्रदीप सिंग हे मागील सुमारे २० वर्षांपासून ट्रकचालक म्हणून काम करीत होते. ते चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या १८ चाकी ट्रेलरवर चालक म्हणून कार्यरत होते. १६ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास ते घुग्घुस येथून ड्युटीवर गेले होते. वर्धा येथे सिमेंट पोहोचवून ते घुग्घुसकडे परतत होते.

रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी मुलगा प्रिन्स याला फोन केला. ऑनलाइन पैसे टाकण्यास सांगितल्यानंतर काही वेळाने पुन्हा फोन करून अर्ध्या तासात घुग्घुसला पोहोचतो असे सांगितले. वडील लवकरच घरी येणार असल्याने मुलगा जेवण करून झोपी गेला. मात्र, मध्यरात्री साडेबारा वाजता पोलिसांचा फोन आला आणि वडिलांचा उर्जाग्राम गेटजवळ अपघात झाला असून ते वाहनाच्या कॅबिनमध्ये अडकले आहेत, अशी माहिती मिळाली.

मुलगा मित्रासह तातडीने घटनास्थळी पोहोचला. तेथे प्रदीप सिंग हे ट्रेलरच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत होता. पोलिस व नागरिकांच्या मदतीने त्यांना कॅबिनमधून बाहेर काढण्यात आले आणि १०८ रुग्णवाहिकेने भद्रावती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

मुलगा प्रिन्स सिंग याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, महामार्गाच्या मध्यभागी MH-३४-BZ-८४७४ क्रमांकाचा १८ चाकी ट्रेलर उभा होता. या ट्रेलरची टेललाईट सुरू नव्हती तसेच रिफ्लेक्टरही लावलेले नव्हते. त्यामुळे अंधारात महामार्गाच्या मध्यभागी उभा असलेला ट्रेलर वडिलांना दिसला नाही आणि त्यांची गाडी त्यावर आदळली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अर्ध्या तासात घरी येतो हे वडिलांचे शेवटचे शब्द ठरतील, याची कल्पनाही मुलाला नव्हती. वडिलांच्या परतीची वाट पाहणाऱ्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने घुग्घुस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी संबंधित ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास करीत आहेत. 





  Print






Related Photos