महत्वाच्या बातम्या

 बल्लारशाह रेल्वे स्थानकात तत्काळ तिकिटासाठी आणखी एक काउंटर सुरू : अजय दुबे यांच्या प्रयत्नांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी आणि तत्काळ तिकिटांसाठी होणारी गैरसोय लक्षात घेता बल्लारशाह रेल्वे स्थानकात १२ नोव्हेंबरपासून तत्काळ तिकिटासाठी आणखी एक काउंटर सुरू करण्यात येणार आहे. झेडआरयूसीसीचे (ZRUCC) सदस्य अजय दुबे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, त्यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हा निर्णय घेतला आहे.

अजय दुबे यांनी ११ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती गर्दी आणि तत्काळ तिकीट मिळविताना होणाऱ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आणखी एक तत्काळ काउंटर सुरू करण्याची मागणी केली. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमन मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ अतिरिक्त काउंटर सुरू करण्याचे निर्देश दिले.

बल्लारशाह रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या या मार्गावरील दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. जंक्शन असल्यामुळे येथे दररोज जवळपास १५० प्रवासी रेल्वेगाड्यांची ये-जा होते. प्रत्येक गाडीला या स्थानकावर थांबा असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ असते.

विशेष म्हणजे, बल्लारशाह परिसरात जवळपास २२ राज्यांतील नागरिक वास्तव्यास असून, त्यामध्ये स्थलांतरित कामगारांची संख्या मोठी आहे. दिवाळी, भाऊबीज आणि छठ पूजेसारख्या सणांच्या काळात हे कामगार मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे प्रवास करतात. मात्र, तत्काळ तिकिटासाठी एकच काउंटर उपलब्ध असल्याने अनेक प्रवाशांना तिकीट मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत होता.

आता १२ नोव्हेंबरपासून आणखी एक तत्काळ काउंटर सुरू होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अजय दुबे यांनी प्रवाशांच्या समस्येकडे लक्ष वेधून अतिरिक्त काउंटर उपलब्ध करून दिल्याने रेल्वे प्रवाशांकडून त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत होत आहे.





  Print






Related Photos