महत्वाच्या बातम्या

 आष्टी तालुक्यातील अभिजितने कंपनीतील नोकरी सोडून रेशीम शेतीतून मिळविले लाखांचे उत्पन्न


-  संपूर्ण कुटुंबाच्या कष्टाने मजुरीचा खर्च वाचवला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : सध्या संपूर्ण भागात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पारंपरिक पिके पूर्णपणे हातची गेली असून बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. अशा या संकटसमयी आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथील एका सुशिक्षित तरुणाने मात्र रेशीम शेतीच्या जोरावर दुष्काळावर यशस्वी मात केली आहे. बीएससी  शिक्षण घेतलेल्या अभिजित बन्नगरे या तरुणाने नागपूर येथील कंपनीतील नोकरी सोडून थेट गावाकडे धाव घेतली आणि आई लता दिलीप बन्नगरे यांच्या नावे असलेल्या शेतीत हा यशस्वी प्रयोग करुन तीन वर्षात लाखांचे उत्पन्न मिळविले.

दुष्काळासारख्या परिस्थितीत इतर पिके पूर्णपणे वाया जातात, मात्र रेशीम शेती ही अत्यंत कमी कालावधीत मोठे उत्पन्न देणारी एकमेव शेती आहे, असे अभिजित सांगतो. हवामानातील बदलामुळे एखादा बँच वाया गेल्यास खचून न जाता अवघ्या दीड महिन्यात पुन्हा नवीन बँच घेता येते. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान टळते. गणिताचा विद्यार्थी असलेल्या अभिजितने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आईच्या नावे शेती असलेल्या शेतीत योजनेचा लाभ घेत संपूर्ण कुटुंबाच्या साथीने श्रमाचे आणि व्यवस्थापनाचे अचूक गणित मांडले. यामुळेच ३ वर्षांत ९ लाख ७८ हजारांचा टप्पा पार करणे शक्य झाले. दुष्काळाच्या काळात जिथे जगणे कठीण झाले आहे, तिथे अभिजितने थेट नवीन कार खरेदी केल्याने, सुशिक्षित तरुणांनी स्वतः शेतात राबून आधुनिक तंत्रज्ञानाची आणि रेशीम विभागाच्या मार्गदर्शनाची जोड दिल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

रेशीम रक्षति रक्षितः म्हणजेच आपण जर रेशीम शेतीची मनापासून काळजी घेतली तर हीच रेशीम शेती आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आणि भविष्याचे रक्षण करते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. शहरात जाऊन तुटपुंज्या पगारावर दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा सुशिक्षित तरुणांनी आपल्या हक्काच्या शेतीकडे वळले पाहिजे. शेतात स्वतः कष्ट करायची तयारी ठेवा. बाहेरच्या मजुरांवर अवलंबून न राहता संपूर्ण रेशीम शेती कुटुंबाने मिळून केली.

आई, वडिलांच्या दूरदृष्टीमुळे आणि रेशीम विभागाच्या रेशीम विकास अधिकारी रजनी बन्सोड, तत्कालीन क्षेत्र सहायक भैरम, तसेच क्षेत्र सहायक शुभम ताकोते या सर्वांच्या वेळोवेळी मिळालेल्या मोलाच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे मी आज हे यश मिळवू शकलो. अपयशाची भीती न बाळगता तरुणांनी स्वतः शेतात काम करून नवनवीन प्रयोगांची कास धरली, तर शेतीमधूनही आलिशान कार घेण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते! असे अभिजीत बन्नगरे यांनी सांगितले.





  Print






Related Photos