चोप येथील शेतकऱ्याने बनविला ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालणारा बहुपयोगी 'पल्टी डोजर'


- अल्प भू-धारक शेतकऱ्यांना ठरु शकतो फायदेशीर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  देसाईगंज :
शेती हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असलेला विषय आहे. शेती करीत असतांना शेती ही प्रामुख्याने मजुर केंद्रित आहे. जास्तीत - जास्त लोकांना रोजगार पुरवणारी आहे. शेतीत पूर्वमशागत ,लागवड ,काढणी ,विपणन करतांना मजुराच्या मोठ्याप्रमाणात समस्या निर्माण होतात. किंबहुना  मजुर वेळेवर उपलब्ध न झाल्यास वेळेवर शेतीची कामे होऊ शकत नाही . त्यामुळे शेतकऱ्यांना तोटाही सहन करावा लागतो. मजुरांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होतो .त्यामुळे शेती ही तोट्यात जाते.शेतीच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी शेतीच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे. यासाठी शेतीमध्ये यांत्रिकीकरण शिवाय पर्याय नाही. हीच बाब हेरुन अनेक शेतकरी अल्पभूधारक  शेतकऱ्यांना परवडेल अशा लहान -लहान यांत्रिकीकरणाच्या शोधात असतात. अशाच शोधात असतांना देसाईगंज तालुक्यातील चोप येथिल शेतकऱ्याने स्वतः आपल्या कल्पनेतून ट्रॅक्टरच्या साह्याने चालणारा बहुपयोगी "पल्टी डोजर " बनविला आहे.
 बहुपयोगी पल्टी डोजर बनविणाऱ्या  शेतकऱ्याचे नाव आहे  अशोक बोंडूजी नाकाडे. दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या अशोक यांना  लहानपणापासूनच शेतीची आवड आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जीत १ एकर  शेती आहे. पूर्वी कृषी मित्र म्हणून  काम पाहत असतांनाच सोबतच  शेतीत छोटे -छोटे यांत्रिक प्रयोग करण्याचा छंद जोपासला .यापूर्वी त्यांनी ट्रॅक्टर वर  चालणारे  पाणीफेकणारे पंप सुध्दा तयार केले . ते  शेतकऱ्यांना काही प्रमाणात उपयोगी ठरले.   सध्या शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कुठलेही तांत्रिक शिक्षण घेतले नसतांना  ट्रॅक्टर यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण  घेतलेल्या मुलाच्या सहकार्याने वेल्डींग चा घरीच छोटासा व्यवसाय सुरु केला.
  दिवसेंदिवस वेळेवर मजुर  उपल्बध नसल्याने शेतीच्या कामात अडचणी येतात. शेतकऱ्यांना धुरे भरणे,जमिन सपाटीकरण करणे,धान उचलणे ,शेणखत शेतीत नेऊन टाकणे यासारखी शेतीची  कामे करावी लागतात.यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते.यावर काहीतरी उपाय शोधला पाहीजे या कल्पनेतून अशोकने  ट्रॅक्टर वर   चालणारा बहुपयोगी असा पल्टी डोजर घरी उपलब्ध असलेल्या वेल्डींग मशिनच्या साह्याने  बनविला . यासाठी त्यांनी भंगारात पडलेल्या लोखंडाचा वापर करुन खर्चात बचत केली. पल्टी डोजरचे  भाग बनवितांना  बकेट बनविण्यासाठी १८ एमएम चा लोखंडी पत्रा,४ बाय २ आकाराचे लोखंडी एंगल, बकेट  स्प्रींग पट्टा, होन्डा गाडीचे जुने शॉकअप  वापरले. यासाठी त्यांना साधधारणतः २० ते २२ हजार रुपयाचा खर्च आला. या  यंत्राचा वापर शेतकऱ्यांना शेती सपाटीकरणासाठी ,शेणखत उचलण्यासाठी  ,बैलगाडीत  भरण्यासाठी ,कडधान्य गोळा करण्यासाठी,तणस बैलगाडीत किंवा ट्रॅक्टर ट्रालीत  भरण्यासाठी ,झाडाची खोड उचलण्यासाठी , खुले धान्य उचलण्यासाठी, धान्याचे बोरे उचलण्यासाठी, मुरुम, माती उचलण्यासाठी उपयोग होतो. त्यासाठी फक्त वेगवेगळी बकेट शेतकऱ्यांना वापरावी लागेल , असे त्यांचे म्हणणे आहे.
  हा यंत्र बनविण्यासाठी अशोक सह दोन व्यक्तींना दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागला. यंत्र बनविण्यासाठी कमी खर्च लागत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहज परवडणारा आहे. त्यासाठी  शेतकऱ्याकडे  कोणत्याही क्षमतेचा  ट्रॅक्टर  असणे आवश्यक आहे. अशोक यांनी आपला यंत्राचा वापर आयसर कंपनीच्या ट्रँक्टरच्या साह्याने करीत आहे. या यंत्राचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास मोठ्याप्रमाणात  मजुरांची गरज शेतकऱ्यांना भासणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन शेती जास्त फायदेशीर ठरेल असे त्यांचे म्हणणे आहे.
 अशोक नाकाडे या शेतकऱ्याने बनविलेला पल्टी डोजर अल्पभूधारक शेतकऱ्यांना बहुउपयोगी ठरल्यास  शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर होईल . त्यांचा  हा यांत्रिकीकरणाचा प्रयोग परीसरात आगळावेगळा असून कौतूकाचा  विषय ठरत आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-20


Related Photos