महत्वाच्या बातम्या

 राहुल गांधींवरील एफआयआरविरोधात चंद्रपुरात काँग्रेसचा एल्गार : भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कथित द्वेषपूर्ण एफआयआरच्या निषेधार्थ चंद्रपूर शहरात काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच उत्तराखंडमधील भाजप कार्यकर्त्यांविरुद्धही एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल एफआयआरचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. राजकीय विरोधकांविरुद्ध द्वेषभावनेतून कारवाई न करता लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील सभेनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या कथित ‘शुद्धीकरण’ प्रकाराची चौकशी करून संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सुभाष धोटे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी काँग्रेस सातत्याने संघर्ष करीत राहील, असे सांगितले. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

मोर्चात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष पराग पास्ते, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदा जेनेकर, शहर महिला जिल्हाध्यक्षा चंदा वैरागडे, सुनंदा धोबे, किसान सेल जिल्हाध्यक्ष दीपक वाढई, प्रवीण पडवेकर, अंबिका प्रसाद दवे, गोपाल अमृतकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, चंद्रपूर ब्लॉक अध्यक्ष अनिल नरुले, विद्या ठाकरे, संगीता भोयर, सुनीता गोवर्धन, रामकृष्ण कोंडरा, देवानंद लांडगे, संतोष कुर्रा, विशाल भारती, निस्सार शेख यांच्यासह जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





  Print






Related Photos