भद्रावतीत बाल लैंगिक शोषणाचे व्हिडीओ प्रकरण : ५२ वर्षीय संशयिताविरुद्ध सायबर टिपलाईनवरून गुन्ह्याची नोंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ इंटरनेटवर पाहणे, डाउनलोड करणे आणि साठवून ठेवल्याच्या संशयावरून भद्रावतीतील ५२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. National Cyber Crime Reporting Portal (NCRP) मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी National Crime Records Bureau (NCRB), नवी दिल्लीमार्फत सायबर पोर्टलवरून Cyber Tipline Report क्रमांक २४१५४७५५६ भद्रावती पोलिसांना प्राप्त झाला. या अहवालानुसार २ जानेवारी २०२५ रोजी इंटरनेटचा वापर करून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य डाऊनलोड, अपलोड अथवा शेअर केल्याची माहिती समोर आली होती.
सायबर टिपलाईनमध्ये संबंधित इंटरनेट कनेक्शनची माहिती मिळाल्यानंतर इंटरनेट सेवा पुरवठादाराकडून प्राप्त Subscriber Detail आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत संबंधित इंटरनेट कनेक्शन भद्रावती येथील ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एका ५२ वर्षीय व्यक्तीच्या वापरात असल्याचे समोर आले. संबंधित व्यक्ती शासकीय सेवेत कार्यरत असल्याची माहितीही चौकशीत निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सायबर पोर्टलवर प्राप्त अहवालामध्ये बाल लैंगिक शोषण, बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि अश्लील आशयाशी संबंधित नऊ व्हिडीओंचा संदर्भ असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोपनीय स्वरूपातील प्राप्त डिजिटल पुराव्यांची पाहणी केली असता त्यामध्ये अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण दर्शविणारे आक्षेपार्ह दृश्य असल्याचे तपासात निदर्शनास आले.
या प्रकरणातील तांत्रिक माहिती, सायबर टिपलाईन अहवाल आणि उपलब्ध डिजिटल पुराव्यांच्या आधारे संशयित व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत असून डिजिटल उपकरणे, इंटरनेट वापर आणि संबंधित इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.




Petrol Price




