बिबट्याच्या हल्ल्यात जखमी बालकासाठी सुनील टेकाम यांचे रक्तदान : माणुसकीच्या नात्याने दिला मदतीचा हात!

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नवरात्रीच्या पवित्र पर्वावर माता महाकालीच्या दर्शनासाठी निघालेल्या कार्तिक संजय जाधव या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. बल्लारपूर टोलनाका आणि चुना भट्टी परिसरात घडलेल्या या घटनेत कार्तिक गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच शिवसेना वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील टेकाम यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात धाव घेत रक्तदान केले. त्यांच्या या कृतीतून माणुसकीचा खरा अर्थ पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
नवरात्रीच्या भक्तिमय वातावरणात माता महाकालीच्या दर्शनासाठी कार्तिक जाधव हा आपल्या नातेवाइकांसोबत रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पायी चंद्रपूरकडे निघाला होता. मनात देवीच्या दर्शनाची ओढ आणि भक्तिभाव घेऊन निघालेल्या या तरुणावर वाटेतच बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कार्तिक गंभीर जखमी झाला. आनंदाने आणि श्रद्धेने सुरू झालेला त्याचा प्रवास अचानक वेदना आणि संकटांनी भरून गेला.
जखमी कार्तिकवर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याला रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती शिवसेना वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील टेकाम यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता रुग्णालय गाठले आणि स्वतः रक्तदान करून जखमी तरुणाला मदतीचा हात दिला.
आजच्या धावपळीच्या जगात दुसऱ्याच्या दुःखासाठी थांबणारी माणसे कमी दिसतात; मात्र सुनीलभाऊ टेकाम यांनी कृतीतून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले. रक्तदान ही केवळ मदत नसून एखाद्याला जीवनाची नवी आशा देणारी कृती आहे. संकटाच्या क्षणी पुढे येऊन केलेल्या त्यांच्या या मोलाच्या मदतीचे कौतुक होत आहे.
देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या बालकाचा आयुष्यात संकट आले, पण त्याच वेळी माणुसकीच्या रूपाने मदतीचा हातही पुढे आला. सुनील टेकाम यांच्या रक्तदानातून सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि माणुसकीचा अनमोल संदेश समाजासमोर आला आहे.




Petrol Price




