महत्वाच्या बातम्या

 कपाशीवरील रसशोषक किडी आणि गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन


- नियमित सर्वेक्षण, सापळे व जैविक उपाययोजनांवर भर; आर्थिक नुकसानीच्या पातळीवरच रासायनिक फवारणी करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात कपाशी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कपाशीच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच ऑगस्ट महिन्यापासून कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्यांच्या स्वरूपात दिसून येऊ शकतो. या किडींमुळे पिकाच्या वाढीवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक पद्धतीने किडींचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय -
कपाशी पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने आणि किडींसह इतर पालापाचोळा वेळोवेळी गोळा करून नष्ट करावा. पीक उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी प्रति हेक्टरी २५ पिवळे चिकट सापळे शेतात लावावेत. हे सापळे किडींचे निरीक्षण तसेच नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात.

कपाशीचे शेत तणविरहित ठेवण्यासाठी वेळेवर आंतरमशागत करावी. शेताच्या बांधावरील अंबाडी आणि रानभेंडी यांसारख्या पर्यायी यजमान वनस्पती नष्ट कराव्यात. तसेच मृद परीक्षणाच्या आधारे खतांच्या मात्रेचा योग्य वापर करावा. संतुलित खत व्यवस्थापनामुळे पिकाची निरोगी वाढ होण्यास मदत होते.

कपाशीवरील रसशोषक किडींवर नियंत्रण ठेवणारे सिरफिड माशी, कातीन, ढालकीडे, क्रायसोपा तसेच अनॅसिस प्रजातीचे परोपजीवी कीटक यांसारखे अनेक नैसर्गिक मित्रकीटक शेतात आढळतात. हे मित्रकीटक पुरेशा प्रमाणात आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी, असे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.

आर्थिक नुकसानीच्या पातळीवरच रासायनिक फवारणी -
कपाशी पिकामध्ये रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाचे नियमित सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. प्रति पान १० मावा, २ ते ३ तुडतुडे किंवा १०फुलकिडे आढळून आल्यास तसेच मावा, तुडतुडे व फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या प्रति पान १० किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यास नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

यासाठी प्रति १०लिटर पाण्यात बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मिली, फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही ३० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर -
कपाशी पिकाच्या उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी फेरोमोन अर्थात कामगंध सापळे लावावेत. पिकाची वाढ होत असताना सापळे पिकाच्या वरच्या भागापासून योग्य अंतरावर राहतील, याची दक्षता घ्यावी. प्रति एकर २ किंवा प्रति हेक्टरी ५ फेरोमोन सापळे लावण्याचे कृषि विभागाने सुचविले आहे.

सलग तीन दिवस फेरोमोन सापळ्यामध्ये ८ ते १० पतंग आढळून आल्यास गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना सुरू कराव्यात. कपाशी पिकातील डोमकळ्यांची नियमित पाहणी करून अळीसहित प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या शोधून नष्ट कराव्यात. अशा डोमकळ्या नष्ट केल्यामुळे गुलाबी बोंड अळीच्या पुढील पिढ्यांची वाढ रोखण्यास मदत होते.

निंबोळी अर्काच्या फवारणीवर भर -
कपाशी पिकाच्या उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसांपासून दर १५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. निंबोळी अर्काला पर्याय म्हणून ॲझाडिरॅक्टिन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करता येते.

तसेच कपाशी पिकाच्या उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी गुलाबी बोंड अळीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाटॉइडिया बॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्रकीटकांचा वापर करावा. १० दिवसांच्या अंतराने प्रति हेक्टरी १.५ लाख अंडी या प्रमाणात सहा वेळा हे मित्रकीटक सोडण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आठवड्याला २० झाडांचे निरीक्षण आवश्यक -

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वेळेत ओळखण्यासाठी प्रत्येक आठवड्याला शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडावीत. या झाडांवरील फुले, पात्या आणि बोंडांची संख्या मोजून त्यापैकी गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडांची टक्केवारी निश्चित करावी.

प्रादुर्भावग्रस्त फुले, पात्या आणि बोंडांची टक्केवारी ५ टक्क्यांपेक्षा अधिक आढळून आल्यास कृषि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. यासाठी प्रति १० लिटर पाण्यात क्विनॉलफॉस २५ टक्के २५ मिली, क्लोरपायरीफॉस २० टक्के २५  मिली, प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली, इंडोक्साकार्ब १५.८ टक्के १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के १० मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

एकात्मिक व्यवस्थापनातून किडींचे प्रभावी नियंत्रण -
कपाशीवरील किडींचे व्यवस्थापन करताना केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून राहू नये. पिकाचे नियमित निरीक्षण, पिवळे चिकट सापळे, कामगंध फेरोमोन सापळे, प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या नष्ट करणे, निंबोळी अर्काचा वापर, जैविक नियंत्रण पद्धती, नैसर्गिक मित्रकीटकांचे संवर्धन आणि आर्थिक नुकसानीच्या पातळीवरच आवश्यक रासायनिक फवारणी अशा विविध उपाययोजनांचा एकत्रित वापर करणे आवश्यक आहे.

किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखून योग्य वेळी नियंत्रणाच्या उपाययोजना केल्यास कपाशी पिकाचे नुकसान कमी करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकाची पाहणी करावी आणि आवश्यकतेनुसार कृषि विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.





  Print






Related Photos