शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्या


- आष्टी येथील सद्गुरू साईबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : महान हॉकीपटू आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आष्टी येथील सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करण्यासोबतच नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. के. सिंग होते. प्रमुख अतिथी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्याम कोरडे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. श्याम कोरडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडा क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक अभ्यासापुरते मर्यादित न राहता विविध क्रीडा उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. त्यामुळे क्रीडा आणि शिक्षण यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. पी. के. सिंग यांनी विद्यार्थ्यांनी निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. नियमित व्यायाम, मैदानी खेळ आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाला महत्त्वाचे स्थान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात ध्यानचंद यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. प्रदीप कश्यप यांनी केले. तर प्रा. राहुल आवारी यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला डॉ. दीपक नागापुरे, प्रा. सुबोध साखरे, प्रा. महेश सिलमवार, प्रा. कवींद्र साखरे, कु. शुभांगी डोंगरे, रवींद्र झाडे, उषा माहूरपवार, रमेश वागदरकर, पौर्णिमा गोहणे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली.




Petrol Price




