महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब शिक्षण-समाजाला जोडणारा प्रभावी दुवा - अभिजीत मणियार


- लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : लोक शिक्षण संस्था, वरोरा यांच्या वतीने संचालित लोकमान्य महाविद्यालयात २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वयंशिस्त, राष्ट्रीय एकात्मता आणि समाजसेवेची भावना रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच माजी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब, वरोराचे अध्यक्ष अभिजीत मणियार उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अभिजीत मणियार म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब यांसारख्या संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण आणि समाज यांना जोडणारा प्रभावी दुवा ठरत आहेत. वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती रॅली, वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, रक्तदान, आरोग्य तपासणी, नशामुक्ती अभियान आणि साक्षरता अभियान यांसारखे सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच निबंध, कथाकथन, गीतगायन, वक्तृत्व, वादविवाद, पोस्टर, रांगोळी, रील स्पर्धा तसेच एकांकिकांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले जाते. अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण होत असल्याचे मणियार यांनी नमूद केले.

प्रत्येक वेळी अपयश आले तरी ते एक नवे आव्हान आणि पुढील यशाची संधी घेऊन येते. त्यामुळे व्यापक दृष्टिकोन ठेवून दैनंदिन जीवन आनंदाने जगा, असा मोलाचा संदेश त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना दिला. तसेच स्वयंसेवकांनी सामाजिक उपक्रमांमध्ये घेतलेल्या सहभागाचे कौतुक केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, समाजसेवा, राष्ट्रीय एकात्मता, मूल्यशिक्षण, सामाजिक बांधिलकी तसेच विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा अधिकाधिक लाभ घेऊन समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचेही कौतुक केले.

राष्ट्रीय सेवा योजना दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा त्यांच्या नियमित सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, स्तवन आणि गोंडवाना विद्यापीठ गीताने झाली. कार्यक्रमाचा समारोप ‘खरा तो एकची धर्म’ या सामुदायिक प्रार्थनेने करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत पुरी यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. रवींद्र शेंडे यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा. शास्त्रकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि माजी स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





  Print






Related Photos