चारा छावणीत घेतली जातेय जनावरांसोबत माणसांचीही काळजी, चारा छावणीच बनली अनेक शेतकऱ्यांचे घर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई / म्हसवड :
जनावरांना चारा कुठेच उपलब्ध होत नसल्याने राज्य शासनाने गंभीर स्वरूपाचे दुष्काळ जाहीर केले असताना सुद्धा प्रशासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते. अशात शेतकऱ्यांनी जनावरांची देखभाल कशी करायची म्हणून खाजगी स्वरूपात सन २०१८ - १९ मधील जानेवारी महिना सुरु होताच राज्यातील पहिली चारा छावणी नेहमीच सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील माणदेशी फाउंडेशनने बजाज फाऊंडेशनच्या सहकार्याने म्हसवड शहरातील मेघासिटी येथे सुरु करण्यात आली आहे.
सातारा माण मधील म्हसवड हे नगर नेहमीच दुष्काळावर चर्चित राहिलेले गाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यात वर्षातील सर्वात कमी पाऊसाची नोंद देखील इथेच होत असते. नेहमीच सामाजीक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील माणदेशी फाउंडेशनने बजाज फाऊंडेशनच्या सहकार्याने म्हसवड शहरातील मेघासिटी येथे सुरु केलेल्या जनावरांच्या एकमेव चारा छावणीत आठवडाभरातच साडे ५ हजाराहुन अधिक जनावरे दाखल झाली असल्याने याठिकाणी यात्रेचे स्वरुप आले असुन जनावरांच्या देखभालीसाठी चारा छावणीतच रहात असलेल्या शेकडो शेतकऱ्यांची  देखभाल आता फाऊंडेशनच्या माध्यमातुन केली जात आहे, त्यांना पिण्याचे पाणी व थंडीपासुन बचाव करण्यासाठी गरमा गरम ब्लँकेट देण्याबरोबरच त्यांच्यासाठी अल्प दरात वैद्यकिय सेवा ही उपलब्ध करुन दिली असल्याने आता छावणीच आपले घर बनले असल्याच्या अनेक प्रतिक्रिया हजारो शेतकऱ्यांतून येत आहेत.
माण तालुक्यात पडत असलेल्या गंभीर दुष्काळाचा सामना करण्यासाठी येथील शेतकरी नेहमीच सज्ज असतो, यंदाही तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ पडला असल्याने जनावरांना चारण्यासाठी जवळपास चारा कोठेच उपलब्ध नाही त्यामुळे दावणीवरच जनावरांचा हंबरडा सुरु आहे. चाऱ्याअभावी जनावरांची होत असलेली तडफड पाहुन बळीराजाच्या डोळ्यात रोज अश्रु उभे राहत आहेत. जनावरांची ही तडफड पाहुन बळीराजाचे अश्रु पुसण्यासाठी सर्वप्रथम एक पाऊल पुढे टाकत येथील माणदेशी फाउंडेशनने जनावरांसाठी चारा छावणी सुरु करण्याचा निश्चय केला त्याला बजाज फाऊंडेशन ने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. अन नवीन वर्षाचा सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी पासुनच येथील मेघासिटी येथे सुरु झाली जनावरांची चारा छावणी, ही चारा छावणी राज्यातील पहिली जनावरांची चारा छावणी ठरली आहे. अद्यापही शासनाकडुन चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय जाहीर नसल्याने माणदेशीने सुरु केलेल्या या चारा छावणी आठवडाभरातच सुमारे ५ हजारांहुन अधिक जनावरे घेवुन शेकडो शेतकरी दाखल झाले आहेत. तालुक्यात एकही जनावरांची चारा छावणी अद्याप सुरु नसल्याने चाऱ्याअभावी जनावरांची होत असलेली तडफड पाहुन अनेकांनी आपली जिवापाड जपलेली जनावरे ही कसायाच्या स्वाधीन केली. मात्र यापुढे शेतकऱ्यांचे हे पशुधन कोणत्याही परिस्थितीत कसाबाकडे जावु नये यासाठी माणदेशी ने घेतलेला हा धाडसी निर्णय शेतकऱ्यांकडेसह जनावरांसाठी वरदान ठरलेला आहे. अवघ्या आठवडाभरातच ५ हजाराचा टप्पा ओलंडलेल्या सदरच्या या चारा छावणीत जनावरांसाठी दररोज ऊस, मका, पेंड, सरकी आदी खाद्य दिले जात आहे, तर जनावरांसोबत छावणीतच राहणाऱ्या शेतकऱ्यांचा थंडीपासुन बचाव व्हावा यासाठी त्यांना गरमा गरम ब्लँकेट दिली जात आहेत, दिवसभर कडक असे ऊन पडत असल्याने ऊन्हापासुन जनावरांना त्रास होवु नये याकरीता नुकतेच फाऊंडेशनच्या वतीने ग्रीन शेड नेटचे ही वाटप करण्यात आले आहे. तर जनावरांना कोणताही संसर्ग आजार होवु नये यासाठी फाऊंडेशनच्या वतीने खाजगी डॉक्टरांची एक टिम तैनात ठेवण्यात आले आहे. जनावरांच्या देखभालीसाठी छावणीतच राहणाऱ्या शेतकऱ्यांचेही आरोग्य निरोगी रहावे यासाठी फाऊंडेशनच्या वतीने त्याठिकाणी अत्यल्प दरात वैद्यकिय सेवा सुरु केली आहे. त्यामुळे जनावरांच्याच आशीर्वादामुळे आपलेही येथील आरोग्य निरोगी रहात असल्याची भावना छावणीतील असंख्य शेतकऱ्यांची बनली आहे.

# दुष्काळ व चारा छावणी वर सरकार किती गंभीर आहे. याचे उत्तम उदाहरण आहे.असाच जर सत्तेचा माज जर या सरकार ला राहिला तर माज उतरवायला वेळ लागणार नाही. :– खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटन

# म्हसवड येथे सुरु झालेली चारा छावणी हा उपक्रमाचा आदर्श सहकाराच्या जीवावर स्वतःची घरे मोठं केलेल्या नेत्यांनी थोडा जरी घेतला. राज्यातील शेतकऱ्यांना प्रश्न चुटकीसरशी मिटेल :– संदीप गिड्डे, समन्वयक, राष्ट्रीय किसान महासंघ

# शेतकरी आणि समाजात दुष्काळीची जाणीव असलेले समजा घटक एकत्र येऊन अशा प्रकारे चारा छावणी सुरु करतात हि अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. मात्र त्याबरोबरच सरकारला अद्याप चारा छावण्या गावोगावी सुरु करण्याचे सद्बुद्धी झालेली नाही. हि शेतकऱ्यांसाठी अत्यंत काळजी वाढवणारी बाब आहे. दुष्काळ जाहीर करून केवळ भागणार नाही, गावोगाव चारा छावणी सुरु करून, पीक नुकसानीची भरपाई देणे, पिण्याचे पाणी, रोजगार, रेशन या बाबत तातडीने सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारने पुढे येण्याची आवश्यकता आहे. :– डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभा तथा सदस्य केंद्रीय किसान कमिटी

जनावरे आमचे आधारस्तंभ तर भाऊ व भाभी आमचे दैवत :– शेतकरी

माण तालुक्यात यापुर्वीही म्हणजे २०१२ साली असाच गंभीर दुष्काळ पडला होता त्यावेळीही शेतकर्यांच्या मदतीला माणदेशी फाउंडेशन धावुन आले होते त्यामुळे बळीराजाचे हे लाखमोलाचे पशुधन १८ महिने सांभाळण्याचे औदर्य या फाउंडेशन ने दाखवले होते. नेहमीच्या दुष्काळी परिस्थिती मुळे शेती पेक्षा दुभती जनावरे हीच शेतकऱ्यांचे खरे आधारस्तंभ ठरले आहेत, तर हे आधारस्तंभ ज्यांच्यामुळे दुष्काळात जोपासली जातात ते विजय सिन्हा ( भाऊ ) व चेतना सिन्हा ( भाभी ) हे शेतकऱ्यांचे दैवत ठरले आहेत अशा बोलक्या प्रतिक्रिया हजारो शेतकरी वर्गातुन येत आहेत.   Print


News - Rajy | Posted : 2019-01-13


Related Photos