शिवार फेरीत वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अनुभव

- २२८ पीकवाणे व तंत्रज्ञानाचे जिवंत प्रात्यक्षिक; सुधारित कापूस, सोयाबीन व तुरीच्या वाणांना शेतकऱ्यांची पसंती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेतली. पोकरा मॉडेल व्हिलेज अंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, महिला बचतगट, युवक-युवती तसेच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवार फेरीला भेट दिली.
शिवार फेरीदरम्यान उभारण्यात आलेल्या विविध पीक प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांना सुधारित वाण, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष पाहता आली. सघन कापूस लागवडीसाठी दफ्तरी-२१२१, एकेए-धवल, एकेए-७ आणि सुवर्ण शुभ्रा या वाणांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचप्रमाणे सोयाबीनमधील पीडीकेव्ही अंबा व सुवर्ण सोया, तर तुरीतील पंचगंगा या वाणांनाही शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली.
२५ एकरांवर २२८ पीकवाणे व तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक -
शिवार फेरीचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या तब्बल २५ एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी विविध पिके आणि कृषी तंत्रज्ञानाची जिवंत प्रात्यक्षिके उभारण्यात आली आहेत. यामध्ये ११० खरीप पिके, २७ भाजीपाला पिके, ६५ फुलवर्गीय पिके आणि १५ तंत्रज्ञान शिफारसी, अशा एकूण २२८ पीकवाणे व तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहता आले.
याशिवाय विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे सुमारे ३ हजार २०० हेक्टर क्षेत्र तसेच दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप बियाणे बीजोत्पादन कार्यक्रमाचीही शेतकऱ्यांनी पाहणी केली. तेलबिया, कडधान्ये, तृणधान्ये, कापूस, चारा पिके, भाजीपाला आणि फुलपिकांच्या विविध जातींची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांनी बारकाईने पाहून त्याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेतली.
कमी पाणी, कमी कालावधीत उत्पादन वाढीचे तंत्र -
हवामानातील बदल, पाण्याची उपलब्धता आणि वाढता उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर कमी पाणी, कमी कालावधी आणि कीड-रोगांचा तुलनेने कमी प्रादुर्भाव असलेल्या पिकांच्या माध्यमातून उत्पादनक्षम शेती कशी करता येईल, याची माहिती शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून घेतली. शेती उत्पादन वाढविण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सुधारित पीक व्यवस्थापन, आधुनिक पीक वाण आणि तंत्रज्ञानाचा वापर याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धनावर भर -
शिवार फेरीमध्ये केवळ पीक उत्पादनावरच नव्हे, तर शेतीपूरक व्यवसाय, कृषी प्रक्रिया आणि स्थानिक पातळीवरील मूल्यवर्धनावरही भर देण्यात आला. जैविक खते निर्मिती, गांडूळखत निर्मिती तंत्रज्ञान, पीकेव्ही मिनी दाल मिल, ऑईल मिल, स्पायरल सेपरेटर, फ्रुट रायपनिंग चेंबर, क्लीनर, ग्रेडर, हळद लावणी व काढणी यंत्र, कांदा चाळ तसेच मोटार ऑपरेटेड शेंगा फोडणी यंत्राची शेतकऱ्यांनी पाहणी केली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतमालाची प्राथमिक प्रक्रिया, साठवणूक, प्रतवारी आणि मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करता येऊ शकतात, याची माहितीही शेतकऱ्यांनी घेतली.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे योगदान -
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अकोला कृषी विद्यापीठात शिवार फेरीचे नियोजन व आयोजन यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक अरविंद उपरीकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, आत्माच्या उपप्रकल्प संचालक राणी गायकवाड यांच्यासह कृषी विभाग, आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संशोधन केंद्रातील तंत्रज्ञान केवळ ऐकून किंवा वाचून नव्हे, तर प्रत्यक्ष शेतावर पाहता आल्याने आधुनिक शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होण्यास मदत होत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राने कळविले आहे.




Petrol Price




