नांदाफाट्यात बंद खोलीत सट्टापट्टीचा अड्डा : पोलिसांच्या छाप्यात १९ जण जेरबंद, १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नांदाफाटा येथील ताज चिकन सेंटरजवळील एका बंद खोलीत सुरू असलेल्या सट्टापट्टीच्या अड्ड्यावर गडचांदूर पोलिसांनी छापा टाकून १९ जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि सट्टापट्टीच्या चिठ्ठ्यांसह एकूण १ लाख ९ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७ वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत आरोपी राजू अशोक ठाकरे (३५), किशोर संपतलाल सुराणा (४७), प्रभाकर दत्तुजी कुरारकर (६०), राकेश मारोती येमुले (३५), सोडवली पोचम नुसेंटी (४७), सागर राजेश धोत्रे (२६), कार्तिक निळकंठ हस्ते (३२), किशोर उद्धवराव लिपटे (५६), शेख रसूल शेख मतीन (६५), मनोज मारोती बोटले (५०), यशवंत सदाशिव भोयर (४४), सुनील गणपत गेडाम (३८), रवि महादेव बावणे (५६), महादेव खुशालराव डोहे (५५), सतेंद्र विदेशी सिंग (५१), उमेश पंजाबराव आडे (३९), मारोती दादाजी पाके (५०), महेश गणपत ताकसांडे (४६) आणि रविंद्र एकनाथ ठाकूर (४७) यांचा समावेश आहे. तसेच सट्टापट्टी चालविण्याच्या आरोपावरून किट्टू जयस्वाल आणि राजू भटवलकर या दोघांचा शोध सुरू आहे.
नांदाफाटा येथील ताज चिकन सेंटरजवळील बंद खोलीत काही व्यक्ती पैसे घेऊन चिठ्ठ्यांवर आकडे लिहून सट्टापट्टीचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. यावेळी १९ जण सट्टापट्टी खेळताना आढळून आले. पोलिसांनी केलेल्या झडतीत आरोपींकडून २८ हजार ९९० रुपये रोख, गल्ल्यातील २७ हजार ८७० रुपये, विविध कंपन्यांचे मोबाईल, बॉलपेन आणि ए.के. टाइम बाजारच्या २५ चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ९ हजार ८६५ रुपये आहे.
दरम्यान, सट्टापट्टीचा खेळ किट्टू जयस्वाल आणि राजू भटवलकर हे दोघे चालवित असल्याची माहिती एका आरोपीने पोलिसांना दिली. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गडचांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




Petrol Price




