उद्या गडचिरोली पोलिस विभागातर्फे जिल्हास्तरीय रेला नृत्य स्पर्धा


- दहा संघ होणार सहभागी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: आदिवासी जनतेच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना प्रोत्साहन देण्याकरीता पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्र व उपविभागीय स्तरावर पारंपारिक रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा उद्या १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार आहेत.
१५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०१८ दरम्यान रेला नृत्य स्पर्धेला पोलिस ठाणे स्तरावर सुरूवात झाली. जिल्हाभरातून दुर्गम व अतिदुर्गम भागातून ५६० संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील सर्वोत्तम ५८ संघांची निवड २५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१८ रोजी उपविभागीय स्तरावर झालेल्या रेला नृत्य स्पर्धेत करण्यात आली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे दहा संघ जिल्हास्तरावर निवडण्यात आले. 
यामध्ये गडचिरोली उपविभागातील डी वायरस ग्रुप चामोर्शी, कुरखेडा उपविभागातून आदिवासी मांदरी ग्रुप बेलगावघाट, धानोरा उपविभागातून जय माराई माता नृत्य संघ जेवलवाही, पेंढरी उपविभागातून कोंदावाही रेला नृत्य संघ, अहेरी उपविभागातून गोंडवाना जंगम रेला ढेमसा डान्स गृप चौडमपल्ली, हेडरी उपविभागातून पेठा रेला नृत्य संघ, एटापल्ली उपविभागातून बिरसा मुंडा नृत्य कला मंडळ बोलेपल्ली, भामरागड उपविभागातून लाहेरी रेला संघ, जिमलगट्टा उपविभागातून रावणराज नृत्य कला संघ येदरंगा, सिरोंचा उपविभागातून जय सेवा संघ झिंगानूर हे संघ सहभागी होणार आहेत. 
प्रथम विजेत्या संघास २५ हजार रूपये, द्वितीय विजेत्या संघास २० हजार रूपये तृतीय विजेत्या संघास १५  हजार रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धेला जिल्हाभरातून आतापर्यंत ३० हजार नागरीकांचा प्रतिसाद मिळाला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos