महत्वाच्या बातम्या

 भाळवणीत फटाका निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट : दोघे गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / सांगली : शोभेच्या दारू (फटाके) निर्मिती करणाऱ्या कारखान्यात सोमवारी सकाळी भीषण स्फोट होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले. स्फोट इतका प्रचंड होता की, चार ते पाच किलोमीटरपर्यंत परिसर हादरून गेला, तर कारखान्याचे पत्र्याचे शेड सुमारे चारशे फूट अंतरावर उडून फेकले गेले.

या स्फोटात आफताब मन्सूर मुल्ला (वय ३०, रा. भाळवणी) व अमीर उमर मुलाणी (वय ४०, रा. चिंचणी-अं., ता. कडेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सकाळी सुमारे पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.

भाळवणी गावातील बसस्थानकाजवळ मन्सूर मुल्ला यांचा शोभेच्या फटाक्यांची निर्मिती करणारा कारखाना आहे. कारखान्यातील पत्र्याच्या शेडमध्ये सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा आफताब मुल्ला व नातेवाईक अमीर मुलाणी हे दोघे स्फोटकासाठी लागणारी दारू कुटण्याचे काम करीत होते. त्याचवेळी अचानक दारूने पेट घेतल्याने तेथे साठवून ठेवलेल्या दारूचा मोठा स्फोट झाला.

स्फोट इतका भीषण होता की, कारखान्याचे शेड पूर्णतः उद्ध्वस्त झाले. स्फोटाचा आवाज चार ते पाच किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या घटनेमुळे कारखान्यालगत असलेल्या घरांच्या तसेच काही मोटारींच्या काचांना तडे गेले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच विटा येथील अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील दोघांना तत्काळ उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या भीषण घटनेने संपूर्ण खानापूर तालुका हादरून गेला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos