अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण उघड : तीन महिन्यांपासून फरार आरोपी रायपूरहून ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुकला प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या गंभीर प्रकरणाचा बल्लारपूर पोलिसांनी छडा लावत तब्बल तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला छत्तीसगडमधील रायपूर येथून ताब्यात घेतले.
पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध ३९०/२०२६ क्रमांक अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली होती. तपासादरम्यान आरोपी जुबेर झाकीर हुसेन (वय २५ वर्षे), रा. बल्लारपूर हा अल्पवयीन मुलीस घेऊन फरार झाल्याचे निष्पन्न झाले होते.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बल्लारपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रायपूर (छत्तीसगड) येथे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानंतर बल्लारपूर पोलिसांचे पथक तसेच फिर्यादी यांचे विशेष पथक खासगी वाहनाने ९ मे रोजी रायपूरकडे रवाना झाले.
रायपूर येथे मिळालेल्या अचूक लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून अल्पवयीन मुलगी व आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनाही सुरक्षितरित्या बल्लारपूर येथे आणण्यात आले.
प्रकरणातील आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोलीस अंमलदार नरेंद्र वाकडे, विशाल बोथले, महिला पोलीस अंमलदार अर्चना बोरसरे यांनी केले. तपास पथकाच्या तत्पर कारवाईमुळे अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध लागल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




