शेतक-यांनी शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेतीकडे वळावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
- जिल्हाधिका-यांची तुती लागवड व किटकसंगोपन कामाला भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शेतक-यांनी शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून रेशीम शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे. या शेतीतून रेशीम कोषाचे दरमहा उत्पन्न घेऊन शेतक-यांची आर्थिक उन्नती होऊ शकते, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
सेलू तालुक्यातील घोराड येथील विवेक माहुरे यांच्या तुती लागवड व किटक संगोपन कामाला भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिका-यांसह रोहयोच्या उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, सेलू तहसिलदार महेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते. शेतक-यांना मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवड करुन रेशीम कोष उत्पादन करण्याकरीता प्रकल्पासाठी तुती लागवड संवर्धन व किटक संगोपनगृह बांधकाम करतांना मजूरी आणि साहित्यासाठी शासनाकडून लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयांनी काम करावे, असे आवाहनही राहुल कर्डिले यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रेशीम उत्पादनाबाबत येणा-या अडचणी शेतक-यांकडून जाणून घेतल्या व मिळत असलेल्या उत्पन्नाबाबत समाधान व्यक्त केले.
माहुरे यांची चालू वर्षातील सहावी बॅच आहे व सध्या स्थितीत 250 अंडिपुंज किटक संगोपण कार्य सुरु आहे. यामध्ये 1 लाख रुपयाच्यावर उत्पन्न होण्याचे अपेक्षित आहे. तसेच नवीन उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक शेतक-यांना किटक संगोपनगृह बांधकामासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे शेतक-यांनी कमजोर आर्थिक स्थितीत निश्चयाने रेशीम उद्योग उभा करण्यासाठी हातभार लागेल त्यामुळे शेतक-यांनी उत्पन्न वाढीसाठी तुती लागवड करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
News - Wardha