बेसेवाडा गावाला रस्ता व नाल्यावर पूल बांधा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार!


- भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शासन-प्रशासनाकडे मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत गट्टा अंतर्गत येणाऱ्या पूर्णपणे आदिवासी लोकवस्तीच्या बेसेवाडा गावाला ताडगुडा पोहोच रस्त्याशी जोडण्यासाठी माती-मुरूम रस्ता तयार करावा आणि मार्गावरील नाल्यावर कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अशी ठाम मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शासन-प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
बेसेवाडा हे गाव दुर्गम व जंगल परिसरात वसलेले असून गावातील नागरिकांना आजही योग्य वाहनमार्ग उपलब्ध नाही. गावाला जोडणारा मार्ग केवळ जंगल पायवाटेच्या स्वरूपात असल्याने नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात नाल्याला पाणी आल्यास गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध नागरिक आणि रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
गावकऱ्यांनी CPI ला गावात बोलावून घेतली बैठक -
बेसेवाडा गावातील रस्ता व पुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने गावकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गावात बोलावून बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांनी आपल्या दळणवळणाच्या गंभीर समस्या मांडत रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हा प्रश्न प्राधान्याने हाती घेऊन शासन-प्रशासनाकडे मागणी करण्याची भूमिका घेतली.
स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही पूर्णपणे आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावाला रस्त्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. शासन आदिवासी विकासाच्या विविध योजना राबवत असताना दुर्गम भागातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधेसाठी संघर्ष करावा लागत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बेसेवाडा ते ताडगुडा पोहोच रस्त्यापर्यंत माती-मुरूम रस्ता मंजूर करणे, मार्गावरील नाल्यावर कायमस्वरूपी पूल बांधणे, तातडीने स्थळ पाहणी व सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करणे आणि संबंधित शासकीय योजनांमधून आवश्यक निधी मंजूर करून बांधकाम सुरू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. सचिन मोतकुरवार यांचे वक्तव्य : स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही बेसेवाडा या पूर्णपणे आदिवासी लोकवस्तीच्या गावाला रस्ता व पूल उपलब्ध नसणे ही दुर्दैवी बाब आहे.
गावकऱ्यांनी CPI कडे मदत मागितल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. शासन-प्रशासनाने तातडीने रस्ता व पुलाला मंजुरी देऊन बांधकाम सुरू करावे. अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष गावकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडेल. आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य सुरज जककुलवार तसेच बेसेवाडा गावातील नागरिक उपस्थित होते. गावकऱ्यांनी रस्ता व पुलाच्या मागणीला पाठिंबा देत ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. आदिवासी जनतेला रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवू नये. बेसेवाडा गावाचा मुख्य रस्त्याशी संपर्क जोडण्यासाठी रस्ता व पुलाचे बांधकाम तातडीने मंजूर करून पूर्ण करावे, अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शासन-प्रशासनाकडे ठाम मागणी आहे.




Petrol Price




