माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाखाचा निधी देणार – पालक मंत्री डॉ. परिणय फुके


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
 भंडारा जिल्हयाच्या मुख्यालयी माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून लवकरच जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन जागा निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हयात सुरु होणाऱ्या बीपीसीएल प्रकलपात विर पत्नीसाठी १० टक्के जागा उपलब्ध करुन देण्यात येतील, तसेच माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले. विजयश्री  चॅरिटेबल ट्रस्ट व एक्स सर्विसमेन वारिअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित माजी सैनिकांच्या मेळावा साखरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनिल मेंढे होते. आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, ॲड. रामचंद्र अवसरे, म्हाडा अध्यक्ष तारिक कुरेशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मुकेश साकूरे, गिऱ्हेपुंजे, क्षीरसागर, काळे महाराज उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, देशातील सर्व समस्यांच्या ठिकाणी निवारणासाठी   सैनिक अग्रेसर असतात. ९ ऑगस्ट क्रांती दिन व १५ ऑगस्ट  स्वातंत्र्यदिन यामध्ये माजी सैनिकांचा सत्कार सोहळयाचे आयोजन करुन सुवर्णमध्य साधला. त्यामुळे माजी सैनिकांच्या समस्या व प्रश्नांना सोडविण्यास मदत होणार आहे. विधान सभेच्या सदस्यांच्या मागणीनुसार माजी सैनिकांसाठी १ कोटी रुपये अनुदान शासनातर्फे मंजूर करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात खासदार सुनिल मेंढे म्हणाले की, माजी सैनिकांचे प्रश्न महत्वाचे असून ते सोडविण्याकरीता प्रधान्य देण्यात येईल. भारताला विरांची परंपरा लाभली आहे. सैनिकांसाठी असणाऱ्या समस्या नक्की सोडविण्याचे सागून पवनी येथे शहिद प्रफुल्ल मोहरकर यांच्या स्मारकासाठी १० लाखाचा निधी देण्यात आला आहे. निधी अपूरा असल्यामुळे शासनातर्फे ६० लाखाचा निधी मंजुर करण्यात आल्याचे आमदार अवसरे यांनी सांगितले. माजी सैनिकांची प्रश्न शासन दरबारी कसोशीने मांडून ते सोडविण्याचे आश्वासन आमदार बाळा काशिवार यांनी दिले. सैनिकांचा अवमान होणार नाही हे नागरिकांनी आपल्या कृतीतून दाखवावे. जिल्हयातील सैनिकांच्या समस्या पालकमंत्र्यांनी प्राधान्याने सोडवाव्यात व सैनिकांचा मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी त्यांनी केली. देशाचा विकास व सुरक्षा सैनिकामुळेच होतो. जिल्हयात बांधण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सभागृहासाठी आमदार निधीतून मदत देवू, असे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले. सरकार आणि सैनिक यांच्या मधील दूवा लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांच्या समस्या नक्कीच सोडवू असे ते म्हणाले. माजी सैनिकांच्या समस्या व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येईल. तसेच सैनिकांकडून विद्यार्थ्यांनी शिस्तीचा वारसा घ्यावा व सैनिकांचा सन्मान ठेवावा, असे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले. यावेळी म्हाडा अध्यक्ष तारिक कुरेशी यांनीही  मार्गदर्शन केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करुन उपस्थितांचे मनोरजंन केले. शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचे  वडिल  तसेच माजी सैनिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हयातील माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, त्यांचे पाल्य मोठया संख्येने उपस्थित होते.       Print


News - Bhandara | Posted : 2019-08-10


Related Photos