महत्वाच्या बातम्या

 सोन्याच्या चैनीसाठी मित्रानेच मित्राचा घेतला जीव : अहेरीत आरडी एजंट हत्येचा उलगडा


- दारूच्या व्यसनातून जन्मलेली क्रूरता

विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील आरडी (आवर्ती ठेव) एजंट रवींद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (४९) यांच्या निर्घृण हत्येचा उलगडा अखेर तिसऱ्या दिवशी अहेरी पोलिसांनी केला. केवळ गळ्यातील सोन्याच्या चैनीच्या लोभापोटी दारूच्या व्यसनाने ग्रासलेल्या मित्रानेच ही हत्या केल्याचे धक्कादायक वास्तव मंगळवारी (२१) उघडकीस आले. या घटनेने संपूर्ण अहेरी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, समय्या मल्लया सुंकरी (३५, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला दारूचे तीव्र व्यसन असून, रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पाहून ती लंपास करण्याचा कट त्याने रचला होता. १८ जानेवारी रोजी आरोपीने आपल्या आईच्या मोबाईलवरून रवींद्र यांना फोन करून, मला आरडी काढायची आहे, मदतीला या, असे सांगत चंद्रपूर मार्गावरील परिसरात बोलावले.

दारुपार्टीनंतर निर्जनस्थळी हल्ला -
दोघे नागमंदिर परिसरातील निर्जनस्थळी गेले. तेथे दोघांमध्ये दारुपार्टी झाली. रवींद्र पूर्णपणे नशेत असल्याची खात्री झाल्यानंतर आरोपीने पाठीमागून सत्तूरने पहिला वार केला. जीव वाचविण्यासाठी रवींद्र यांनी प्रतिकार केला; मात्र जोरदार वारात त्यांच्या हाताची बोटे कापली गेली. यानंतर आरोपीने मृत्यू होईपर्यंत त्यांच्यावर सलग अनेक वार करून निर्घृण हत्या केली.

सोन्याची चैन लंपास; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न -
मृत्यूची खात्री झाल्यानंतर आरोपीने रवींद्र यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतकाची दुचाकी जंगलात काही अंतरावर उभी करून तो घरी परतला. पुढे तेलंगणातील बेज्जूर येथे जाऊन त्याने सोन्याची चैन विकल्याचे तपासात उघड झाले आहे.

तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद -
ठोस प्रत्यक्ष पुरावा नसतानाही अहेरीचे पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या तिसऱ्या दिवशी मद्दीगुडम येथून आरोपीला अटक केली. आरोपीला अहेरी न्यायालयात हजर केले असता, नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हत्येच्या धक्क्यातून सावरत नाही तोच अपघातात आणखी दोन बळी -
रवींद्र यांच्या हत्येचा धक्का कुटुंब पचवत नसतानाच, त्यांच्या अंत्यविधीसाठी येत असलेल्या चुलत सासऱ्यांसह अन्य एका व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला. एका व्यक्तीच्या व्यसनाधीन वृत्तीमुळे दोन कुटुंबांचे हसते-खेळते संसार उद्ध्वस्त झाल्याची हृदयद्रावक घटना अहेरी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos