नक्षल्यांच्या नावावर ६० लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अटक
- तर तीन आरोपींचा शोध सुरु
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नक्षली असल्याची बतावणी करून कंत्राटदाराला तब्बल ६० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रयत्न संबंधित कंत्राटदाराच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. यातील खंडणीची मागणी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात यश आले, तर तीन आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे. पोलिसांकडून प्राप्त माहिती नुसार पेंढरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सावंगा खुर्द मंगेवाडा मार्गावरील नदीवरील पुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ९ जानेवारीला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सहा जणांनी जाऊन पुलाच्या कामावर असलेला मजुरांना मारहाण केली. तसेच कंत्राटदाराची माहिती विचारून त्यांच्याकडील दोन मोबाईल हिसकावून घेतले, त्यानंतर त्याच मोबाईल वरून संबंधित कंत्राटदाराला फोन लावला आणि आम्ही नक्षलवादी आहोत असे सांगून काम सुरू ठेवायचे असेल तर आम्हाला ६० लाख रुपये दे, अशी मागणी केली.
कंत्राटदाराने व मजुरांनी या घटनेची माहिती पेंढरी उपपोलीस स्टेशनला दिली त्यानंतर १२ जानेवारी रोजी पुन्हा पैसे मागण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना गावकऱ्यांनी पकडून पोलीस स्टेशनला नेले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुन्हा एका आरोपीला पकडण्यात यश आले. तीन आरोपींचा शोध सुरू आहे. फरार आरोपींमध्ये आत्मसमर्पित नक्षली या प्रकरणातील सर्व आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अटकेत असलेल्यांपैकी आरोपी नितेश मट्टामी वय २६, गणेश नरोटे वय ४२ हे चामोर्शी तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी आहेत, तर प्रभाकर पदा हा गर्दापल्लीतील असून सध्या कोडगल येथे राहतो. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ जानेवारी पर्यंत पीसीआर देण्यात आला. फरार असलेल्या तीन आरोपींमधून दोघे आत्मसमर्पित नक्षली आहेत.
अधिक तपास सुरू असल्याची माहिती पेंढरी उपपोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी सागर पेडाळकर यांनी दिली आहे.
News - Gadchiroli