विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा : समाजकल्याण विभागाची महाविद्यालयांना सुचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र २०१९-२०२० ते २०२५-२०२६ या वर्षातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सर्व महाविद्यालयांना शासनाने ३१ मे २०२६ पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे. या मुदतीनंतर प्रलंबित अर्जासाठी कोणत्याही परिस्थितीत शिष्यवृत्ती अदा करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व प्रलंबित अर्जावर डीबीटी प्रणालीद्वारे तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे, याची सर्व महाविद्यालयांनी नोंद घेऊन अर्ज तात्काळ निकाली काढावे, अशा सुचना समाजकल्याण विभागाने दिल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० ते २०२५-२०२६ या कालावधीतील प्रलंबित अर्ज प्राधान्याने निकाली काढण्यासाठी महाविद्यालयांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात यावी. त्यानुसार महाडीबीटी प्रणालीवर महाविद्यालयांच्या लॉगिनममधील डॅशबोर्ड वर प्रलंबित विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २०१९-२०२० या वर्षातील ५५ अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित, २०२०-२०२१ मधील ४१० अर्ज, २०२१-२०२२ मधील २२१ अर्ज, २०२२-२०२३ मधील २४५ अर्ज, २०२३-२०२४ मधील ९१ अर्ज महाविद्यालय स्तरावर व २८८ अर्ज विद्यार्थीस्तरावर, २०२४-२०२५ मधील २८७ अर्ज महाविद्यालयस्तर व ४४५ अर्ज विद्यार्थी स्तरावर, २०२५-२०२६ मधील १२३० अर्ज महाविद्यालय स्तरावर व 645 अर्ज विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहेत सदर अर्ज महाविद्यालयाच्या प्राचार्यानी तातडीने निकाली काढावेत.
विद्यार्थ्यांनी करावयाची कार्यवाही : प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबात विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील आपला युजर नेम व पासवर्ड वापरून आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासावी. शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असल्यास कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे, याची माहिती घेऊन संबंधित कागदपत्रासह महाविद्यालयाशी संपर्क साधावा. कागदपत्राअभावी शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असल्यास महाविद्यालयाच्या लॉगिनमधून संबंधित कागदपत्रे अपलोड करावी.
विद्यार्थ्याने विहित मुदतीत आपला शिष्यवृत्ती अर्जाची त्रुटीपूर्तता न केल्यास सदर अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे व याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. सदर विद्यार्थ्यांची माहिती, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊनसुध्दा यादी पाहता येईल.
महाविद्यालयांनी करावयाची आवश्यक व तातडीची कार्यवाही : ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमुळे परत पाठवले गेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाने तातडीने संपर्क साधावा. अर्जातील त्रुटीची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज दोन दिवसांत प्राप्त करून घेऊन मंजुरीची कार्यवाही करावी. विहित मुदतीत कार्यवाही न झाल्यास आपण लाभापासून वंचित राहाल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, अशा स्पष्ट सूचना विद्यार्थ्यांना द्याव्यात.
महाविद्यालय लॉगिनमध्ये पहिल्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या हप्त्यासाठी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जावर कोणतीही दिरंगाई न करता महाविद्यालयाने तात्काळ तपासणी करून परिपूर्ण अर्जावर मंजूरीची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० ते २०२५-२०२६ या कालावधीतील शिष्यवृत्ती नियमानुसार पात्र अर्जच या कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत. अर्ज शिष्यवृत्ती नियमानुसार अपात्र असल्यास रिजेक्ट करावेत. महाविद्यालय लॉगिनवर अर्ज प्रलंबित ठेवू नये.
प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सर्व महाविद्यालयांना ३१ मे २०२६ पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास विद्यार्थी व महाविद्यालय सर्वस्वी जबाबदार राहतील, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी यांनी कळविले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




