महत्वाच्या बातम्या

 काँग्रेसमध्ये मोठा भूकंप : बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली पक्षांतर्गत धुसफूस विकोपाला गेली आहे. नाशिक पदवीधरमधील उमेदवारीचा गोंधळ आणि त्यावरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून पक्षातील काही नेते प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत.

पटोले यांच्या नेतृत्वात काम करणे अवघड असल्याचे पत्र थेट दिल्ली दरबारी धाडणारे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने कॉँग्रेसमध्ये मोठा भूपंप झाला आहे. याचा पेंद्रबिंदू हा संगमनेरमध्ये असला तरी याचे हादरे दिल्लीला बसले आहेत. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी हायकमांडची पळापळ सुरू झाली असून महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे.

काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नेतृत्वाच्या मुद्यावरून सुरू असलेला सुप्त संघर्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीमुळे चव्हाट्यावर आले आहे. नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे आल्यापासून पक्षातील धुसफूस सातत्याने चर्चेत आहे. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकदा काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्याने काँग्रेसमधील नेत्यांचे नाना पटोलेंच्या नेतृत्वाबद्दलचे मतभेद जाहीरपण समोर आले आहेत. पटोले आणि थोरात यांच्यातील मतभेदांमुळे प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाचा मुद्दा चर्चेत आला असून काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांनी पाठवलेल्या पत्रांतील तक्रारींची माहिती पक्षश्रेष्ठाना आहे. पक्षांतर्गत वाद मिटवला जाईल, असे काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

लोकांचा संम्रभ दूर व्हावा : विजय वडेट्टीवार

प्रदेशाध्यक्षांनी त्यांची बाजू मांडली. सत्यजित तांबेंच्या भूमिकेवरून थोरातांनी आपली बाजू मांडली. यात सत्यता काय आहे. यावर खऱ्या अर्थाने लोकांमध्ये संभ्रम आहे. मला जे समजतेय त्यात हा संभ्रम दूर व्हावा. आपसात काही तरी शिजतेय असे लोकांना वाटू नये. त्यासाठी सर्व गोष्टी क्लिअर व्हायला हव्यात. विनाकारण कुणाला तरी आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून बदनाम करणे योग्य नाही. हे आम्हालाही मान्य नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेसने आत्मचिंतन करावे : सत्यजित तांबे

बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेसपक्षाने याबाबत आत्मचिंतन केले पाहिजे. काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे, असे नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

शुभेच्छांसाठी फोन केला तेव्हा थोरातांनी राजीनाम्याची माहिती दिली : अजित पवार

त्यांना आज वाढदिवसानिमित्य फोन केला होता. त्यावेळी म्हटले की, बाळासाहेब, आज तुमचा वाढदिवस आहे. आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावे या शुभेच्छा. मात्र, एक बातमी आहे आणि त्याविषयी आज तुम्हाला विचारावे की नको हे कळत नाही. कारण आज तुम्ही गडबडीत असाल. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, दादा, मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले.

हा पक्षांतर्गत विषय

थोरातांच्या राजीनाम्याबाबत माहीत नाही. काहीही असले तरी हा पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे जास्त भाष्य करणार नाही. नाशिक विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यामध्ये काही घटना घडले. त्यामुळे पक्षामध्ये नाराजीचे वातावरण आहे. कारण नाशिकची जागा ही काँग्रेसची हक्काने निवडून येणारी जागा होती. काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होणार आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी पक्षाकडून होत आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सगळे ठीक होईल

थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा आहे की फक्त साधे एक पत्र आहे. याबद्दल माहिती नाही. त्यांचे कोणाशी बोलणेही झालेले नाही. काल पटोलेंसोबत पुण्यातच होतो. त्यांनाही काही याबद्दल काही माहिती नाही. हे सगळे वाद तात्पुरते असतात, सगले ठीक होईल, असा विश्वास काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

हे दुर्दैवी

थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत. नेमके काय घडले याची माहिती घ्यावी लागेल. त्यांची मनधरणी करण्यासाठी पुढाकार घेईन. ते पक्ष सोडून जाणार नाहीत, अशा विश्वास काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. पक्षवाढीसाठी जे करावे लागेल ते सर्वकाही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घटनाक्रम

- भाचा सत्यजित उमेदवारीस पात्र असतानाही त्यास उमेदवारी दिली नाही. यामुळे थोरात पटोले यांच्यावर नाराज झाले आणि दोघांत छुपा संघर्ष सुरू झाला.

- काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर होऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. तसेच सत्यजित यांना अपक्ष अर्ज भरण्यास मदत केली.

- पक्षविरोधी भूमिका घेतल्याने प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी तांबे पितापुत्रांची दिल्लीला तक्रार करून दोघांवरही निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई करताना विश्वासात न घेतल्याने थोरात नाराज झाले.

- नगरमधील थोरातांच्या जवळच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करण्यात आली. यामुळे थोरातांचा पटोले यांच्यावरील रोष अधिकच वाढला.

- सत्यजित यांना डावलल्याने दुखावलेल्या थोरात यांनी निवडणुकीच्या दरम्यान शांत राहणे पसंत केले. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क टाळला.

- सत्यजित यांनी आपल्याला चुकीचा एबी फॉर्म दिला असे, माध्यमांसमोर येऊन सांगितल्यानंतर निवडणुकीचे अर्ज थोरात यांच्या पीएकडे देण्यात आले होते, असा खुलासा प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आला.

- नाशिक पदवीधर उमेदवारीवरून थोरातांबाबत संशय निर्माण करण्याचा प्रयत्न पक्षातीलच काही लोकांकडून झाल्याने त्यांनी थेट हायकमांडला पत्र लिहून नाराजी व्यक्त करत विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिले.

थोरात-नाना हातघाईवर

- बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठाना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. 

- विधान परिषद निवडणुकीदरम्यान जे काही घडले, जे राजकारण झाले ते व्यथित करणारे होते.

- माझ्याविषयी इतका राग असेल तर नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील. 

- विधान परिषद निवडणुकीत राजकारण झाले. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले. सार्वजनिकरीत्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली.

थोरातांच्या राजीनाम्याच्या वृत्ताबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

- बाळासाहेब थोरात आमच्या संपका&त नाहीत, ते आमचे पह्नही घेत नाहीत. त्यांच्या राजीनाम्याचे कोणतेही पत्र आपल्याकडे आलेले नाही.

- दिल्लीत कुणी काय तक्रार केली मला माहीत नाही. हे सगळे राजकारण आहे. याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यामुळे आम्ही जनतेकडे आणि त्यांच्या कामांकडे लक्ष देत आहोत.

- विधान परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत चर्चा करण्यासाठी १५ फेब्रुवारीला बैठक बोलविण्यात आली आहे. त्यावेळी नक्की कुणाचे चुकले याबाबत चर्चा करू. हा पक्षांतर्गत विषय आहे.





  Print






News - Rajy




Related Photos