ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ही समाजाची सामूहिक जबाबदारी


- सामाजिक न्याय भवनात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आणि अनुभवाची समृद्ध शिदोरी असलेले घटक आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा समाजाच्या विकासासाठी उपयोग करून घेताना त्यांना सन्मानाचे व निरोगी जीवन जगण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी व्यक्त केले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वर्धा आणि आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवार, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल होते. यावेळी सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, प्रतिभा भागवतकर, पूर्व विदर्भ प्रादेशिक विभाग, फेस्कॉम नागपूरचे अध्यक्ष जितेंद्र भोयर, प्रा. डॉ. हाशम शेख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. जितेंद्र भोयर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी फेस्कॉमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात मोहनबाबू अग्रवाल यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखण्याची आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांना समाजाने सन्मानाने वागणूक देऊन त्यांना निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवार, वर्धा या संस्थेचे ७५ वर्षे पूर्ण केलेल्या १० ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवाराचे सचिव चंद्रशेखर दंढारे यांच्या ‘ओंजळ’ या मराठी काव्यसंग्रहाचे आणि ‘जलते दिप’या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास एकूण २४१ ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवाराचे पदाधिकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध महामंडळांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Petrol Price




