ब्रह्मपुरीत AI चा गैरवापर करून बनावट उत्पन्न दाखला तयार : महसूल अधिकाऱ्याची स्वाक्षरी अन् शासकीय शिक्काही बनविला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय लेटरहेडवर बनावट उत्पन्न अहवाल तयार करणे, महसूल अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीची नक्कल करणे आणि बनावट शासकीय शिक्का तयार करून दस्तऐवज तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्रात ऑनलाइन सादर करण्याची गंभीर घटना ब्रह्मपुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. ग्रामपंचायत भुज तुकुम येथील संगणक ऑपरेटर नामदेव वसंता झोडे ३५ वर्षे याने हा प्रकार केला. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी मधुकर मनीराम मानकर ५३ वर्षे यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मानकर हे भुज तुकुम, साजा क्रमांक ३४ येथे महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात सातबारा उतारे, नमुना आठ आणि उत्पन्न अहवाल तयार करणे, वितरित करणे तसेच त्यांची पडताळणी करण्याची शासकीय जबाबदारी आहे. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.०५ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत भुज तुकुम येथील संगणक ऑपरेटर नामदेव झोडे याने लाभार्थी ज्ञानेश्वर मुखरू मस्के यांच्या नावाने तयार केलेला उत्पन्न अहवाल ऑनलाइन पद्धतीने तहसील कार्यालय, ब्रह्मपुरी येथील सेतू केंद्रात सादर केला. मात्र, अहवालातील नावात विसंगती आढळल्याने सेतू केंद्रातील कर्मचारी भरत ठवरे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी संबंधित अहवाल पडताळणीसाठी महसूल अधिकारी मानकर यांच्या कार्यालयाकडे पाठविला.
अहवालाची तपासणी करताना मानकर यांनी लाभार्थी ज्ञानेश्वर मस्के यांच्याकडे या दाखल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी असा दाखला स्वतः तयार केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणाची पडताळणी सुरू असताना संगणक ऑपरेटर नामदेव झोडे याने मानकर यांना दूरध्वनी करून संबंधित प्रकरणाची माहिती दिली. लाभार्थ्याची केस आठ ते दहा दिवसांपूर्वी आपल्याकडे आली होती; मात्र ती हरवल्यामुळे ChatGPT या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाचा वापर करून उत्पन्न अहवाल तयार केल्याचे त्याने सांगितले.
या बनावट अहवालाची पाहणी केली असता, त्यावर ग्राम महसूल अधिकारी मानकर यांच्या स्वाक्षरीशी मिळतीजुळती बनावट स्वाक्षरी करण्यात आली होती. तसेच बनावट शासकीय शिक्काही तयार करण्यात आला होता. मानकर यांचे नाव वापरण्याऐवजी रघुनाथ रविंद्र पाडनकर, ग्राम महसूल अधिकारी, साजा क्रमांक ३४, भुज तुकुम, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर असे नाव नमूद करण्यात आले होते. अशा प्रकारे बनावट शासकीय दस्तऐवज तयार करून तो अधिकृत यंत्रणेत सादर करण्यात आला.
या घटनेची माहिती मानकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे तहसीलदार, ब्रह्मपुरी यांना दिली. तहसीलदारांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नायब तहसीलदारांना प्राधिकृत केले. त्यानुसार १५ ऑक्टोबर रोजी भुज तुकुम ग्रामपंचायतीत चौकशी करण्यात आली. या चौकशीतही नामदेव झोडे याने संबंधित गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले.
शासकीय दस्तऐवज तयार करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा गैरवापर, अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीची नक्कल आणि बनावट शासकीय शिक्क्याचा वापर करून उत्पन्न अहवाल तयार करण्याच्या या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी नामदेव झोडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेखलाल गौतम करीत आहेत.




Petrol Price




