चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

- मद्दीगुडम जिल्हा परिषद शाळेच्या विविध प्रश्नांबाबत ग्रामसेवकांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्रामपंचायत किष्टापूर (वेल) हद्दीतील मद्दीगुडम जिल्हा परिषद शाळेत आयोजित माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमादरम्यान शाळेच्या विविध मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील युवकांनी ग्रामसेवकांना निवेदन दिले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षिकाही उपस्थित होत्या.
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सध्याची शाळा इमारत निर्लेखित करून नवीन इमारत उभारावी, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी युवकांनी केली. ग्रामसेवकांनी निवेदनातील सर्व प्रश्नांची दखल घेत ते लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने शाळेच्या विकासासाठी युवकांनी घेतलेल्या या पुढाकाराचे उपस्थितांनी स्वागत केले.




Petrol Price




