महत्वाच्या बातम्या

 चिंतामणी विद्यालयात इंजिनिअरिंग डे उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इंजिनिअरिंग डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेसोबतच हरित ऊर्जा, सौर ऊर्जेचा वापर आणि वीज बचतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला महावितरणच्या इलेक्ट्रिक टेस्टिंग विभाग, चंद्रपूरचे अभियंता प्रशांत ठाकरे, अभियंता बोरकर आणि विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अरुण टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्थेची माहिती देताना राज्यात सुमारे ९ कोटी १५ लाख वीज ग्राहक असून, महावितरणच्या माध्यमातून ४५० शहरांसह ४२ हजार गावांना वीजपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. वीज ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असल्याने विद्युत उपकरणांचा वापर करताना विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची खबरदारी, विद्युत प्रवाहामुळे होणारे धोके तसेच सौर आणि पवन ऊर्जेसारख्या पर्यायी ऊर्जास्रोतांचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. हरित ऊर्जा धोरणांतर्गत सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध अनुदान योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.

ऊर्जेची बचत म्हणजे ऊर्जेची निर्मिती हा संदेश देत गरज नसताना पंखे, दिवे आणि टीव्ही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. पारंपरिक बल्बऐवजी एलईडी बल्बचा वापर करून मोठ्या प्रमाणात वीज बचत करता येते, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पावसाळ्यात वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणाने वीजवाहिनी अथवा केबल तुटलेल्या अवस्थेत आढळल्यास त्यास स्पर्श न करता तातडीने जवळच्या वितरण केंद्राशी संपर्क साधावा किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक चंद्रकांत पावडे यांनी केले. शुभांगी बरडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos