प्रतीकात्मक दहनातून व्यसनमुक्तीचा संकल्प, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली
: तालुक्यातील पोटेगाव मदत केंद्रातील पोलिसांनी शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रविवारी गावात दारू व तंबाखूमुक्ती संकल्प रॅली काढली. ग्रामस्थांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन करीत मुख्य चौकात व्यसनाच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन केले. सर्व गावकरी यात सहभागी झाले होते.  
  गडचिरोली शहरासह ग्रामीण भागात दारू आणि तंबाखूचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. गडचिरोली जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ हा उपक्रम सुरु असून त्याद्वारे व्यसनाविरोधात व्यापक जनजागृती केली जात आहे. पुरुषांसह महिला आणि लहान मुलेही तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जात आहेत. पुरुषांच्या दारू पिण्याने गावांचे सामाजिक आरोग्य बिघडत आहे. हा प्रकार थांबण्यासाठी पोटेगाव येथील पोलीस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी रविवारी व्यसनमुक्ती संकल्प रॅली काढली. सर्व पोलीस कर्मचारी, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, गावातील पुरुष व महिलांबरोबरच लगतच्या चामोर्शी तालुक्यातील गिलगाव, नवरगाव, गुटरगुंडा येथील महिलादेखील रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
‘घ्याल तंबाखूची साथ, तर आयुष्य होईल बरबाद’, दारूविक्रेत्यांचा निषेध असो, तंबाखू-खर्रा मुर्दाबाद, व्यसनमुक्ती जिंदाबाद, तंबाखू, खर्रा खाऊ नका, दारू पिऊन मारू नका अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यानंतर गावातील मुख्य चौकात खर्रा, तंबाखू आणि दारूच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी यावेळी व्यसनमुक्तीचा संकल्प केला. मुक्तिपथ चमूने कोटपा कायदा, बाल संरक्षण कायदा याविषयी सर्वांना माहिती दिली. संकल्प रॅलीत पोलीस मदत केंद्राचे प्रभारी ठाणेदार उमेश चिकणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, शिवराज कदम, सरपंच ओंकारेश्वर सडमाके, उपसरपंच प्रतिभा मोहुर्ले, तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजेश मानकर यांच्यासह गावातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दारूसाठा व साहित्य जप्त

रॅलीनंतर पोटेगाव येथील ठाणेदार उमेश चिकणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी लगतच्या गवळहेटी या गावात धाडसत्र राबविले. दारूविक्रेत्यांची घरे शोधून काढत मोठ्या प्रमाणात दारू, मोहसडवा आणि साहित्य जप्त केले. गावात अशीच दारूविक्री सुरु राहिल्यास खेळ, नाटक घेण्यास परवानगी मिळणार नाही, असा दम पोलिसांनी दिला.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-09


Related Photos