गडचिरोली पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शासनाने पंचायत समिती सदस्यांना १४ व्या वित्त आयोगाचा विकास निधी तसेच सभापती व उपसभापतींना वाहन उपलब्ध करुन न दिल्याने गडचिरोली पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी शुक्रवारी आयोजित मासिक सभेवर बहिष्कार घालून शासनाप्रती रोष व्यक्त केला. तसेच सदस्यांतर्फे विवीध मागण्यांचे निवेदन  आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी यांना देण्यात आले . 
पंचायत समिती गणाचा विकास करण्यासाठी वार्षिक ५० लाख रुपयांचा निधी देण्यात यावा, पंचायत समिती सदस्यांना घरकुल वाटपात कोटा निश्चित करुन प्रती सदस्य पाच घरकुल देण्यात यावे, सभापती व उपसभापतींना पूर्णवेळ वाहन उपलब्ध करुन द्यावे, सभापतींना २० हजार व उपसभापतींना १५ हजार मानधन देण्यात यावे, सदस्यांना पाच हजार रुपये प्रवासभत्ता तसेच एक हजार रुपये बैठक भत्ता द्यावा, जिल्हा नियोजन समितीत पंचायत समिती सदस्यांमधून ५ सदस्यांची निवड करावी, बाजार समितीवर पंचायत समिती सदस्यांमधून एक सदस्य संचालक म्हणून नेमण्यात यावा, सभापती, उपसभापती व सदस्यांना पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत . मागण्या मंजूर होईपर्यंत पुढील सभांवर बहिष्कार कायम राहील, असाही  इशारा सदस्यांनी दिला. 
 निवेदन देतांना सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, सदस्य मारोती इचोडकर, नेताजी गावतुरे, रामरतन गोहणे, शंकर नैताम, जानव्ही भोयर, मालता मडावी, सुषमा मेश्राम, जास्वंदा गेडाम आदी उपस्थित होते .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-29


Related Photos