गडचिरोली : तालुका कृषी अधिकाऱ्यासह लिपिक अडकला एसीबीच्या जाळ्यात


- एसीबी पथकाची या आठवड्यातील ही दुसरी कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कम्बाईन हॉर्वेस्टर खरेदी केल्याने सबसिडीची रक्कम खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच मागणारे तालुका कृषी अधिकारी व कृषी कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडले आहे. सदर कारवाई गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील गडचिरोली - चंद्रपूर मेनरोडच्या बाजूस असलेल्या चहा टपरीवर बुधवारी संध्याकाळी करण्यात आली. एसीबी पथकाची या आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.
संदीप अशोकराव वैद्य (३३) असे लाचखोर लिपिकाचे नाव असून तो जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात लेखा विभागात वरिष्ठ लिपिक आहे. लाचखोर तक्रारदाराकडून ४० हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडला गेला. त्यातील २० हजार रुपयाचा वाटा तालुका कृषी अधिकारी तथा प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप वाहाने (४९) यांचा असल्याचे त्याने कबूल केले.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदारास राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कम्बाईन हॉर्वेस्टर खरेदी केल्याने सबसिडीची रक्कम एकुण ११ लाख रुपये बॅक खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचखोर आरोपी संदीप वैद्य यांनी रुपये ५० हजार लाच रक्कमेची मागणी करुन तडजोडीअंती स्वतः व लाचखोर आरोपी प्रदीप वाहाने यांचेसाठी ४० हजार रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली. संदीप वैद्य यांनी स्वत:च्या आर्थिक फायदयाकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने तक्रारदार यांचेकडून ४० हजार लाच रक्कम गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील चंद्रपूरकडे जाणाऱ्या मेनरोडच्या बाजूस असलेल्या चंद्रप्रकाश गेडाम यांच्या चहा टपरीवर स्विकारतांना रंगेहाथ मिळून आले. तसेच आरोपी संदीप वैद्य यांनी स्विकारलेल्या लाच रक्कमेस आरोपी वाहाने यांनी सहमती दर्शवून लाच रक्कम ४० हजार पैकी २० हजार पंचसाक्षीदारासमक्ष उपविभागीय कृषी कार्यालय गडचिरोली येथे स्विकारल्याने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांचे पर्यवेक्षणात पो. नि. शिवाजी राठोड, पो. नि. श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, नापोशि राजु पदमगिरीवार, स्वप्नील बांबोळे, किशोर जौंजारकर, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकुर, संदिप उडाण, मपोशि जोत्सना वसाके सर्व ला.प्र. विभाग गडचिरोली यांनी केली आहे.
News - Gadchiroli