‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : 
‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात, फाईल दाबून ठेवतात. जोपर्यंत काही मिळत नाही फाईल दाबून ठेवतात’ असे  वक्तव्य  केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. हे वक्तव्य त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून केलं असलं, तरी मंत्र्यांनाही त्यांनी लक्ष्य केल्याचे त्यां बोलले  जात आहे.   इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
गडकरी म्हणाले, “आपल्याला पारदर्शी, निर्णायक आणि वेळेत कामं करायची आहेत. काही लोक असे आहेत, जे पत्नीपेक्षा जास्त फाईलवर प्रेम करतात.  ते फाईल दाबून ठेवतात.  मला प्रामाणिक लोक जे निर्णयच घेत नाहीत, ते आवडत नाहीत. निर्णय न घेणं हे सर्वात चुकीचं आहे ”
रस्ते अपघात हे चुकीचा डीपीआर आणि चुकीच्या इंजिनिअरींगमुळे होतात, असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. त्यासाठी त्यांनी कोल्हापुरातील जयसिंगपूरमधील रस्त्याचं उदाहरण दिलं. जयसिंगपूरमध्ये चुकीच्या सर्व्हेमुळे रस्त्याला वळण द्यावं लागलं. मात्र तिथे शेकडो अपघाती मृत्यू झाले. तो रस्ता आता सरळ केला आहे, त्यामुळे अपघाताचं प्रमाण घटलं आहे, असं गडकरी म्हणाले. 
इंडियन रोड काँग्रेसच्या या ७९ व्या अधिवेशनात रस्ते विकासाबाबत मंथन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी अधिकारी आणि काही मंत्र्यांना टोला लगावला.  Print


News - Nagpur | Posted : 2018-11-23


Related Photos