स्पर्धा परिक्षेतील यशप्राप्तीसाठी अभ्यासासह वेळेचे नियोजन हवे : डॉ. विजय राठोड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
  येथील कृषी व गोंडवन महोत्सवातील  ' स्पर्धा परिक्षा तयारी ' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या पाच दिवसीय प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी  पहिल्या सत्रात झालेल्या व्याख्यानाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले होते.  हे  प्रदर्शन येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात  पार पडले.
  याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचीन ओम्बासे  यांनीही मार्गदर्शन केले.  यावेळी कार्यक्रमास प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर, डॉ. साळुंखे तसेच आत्माचे डॉ. प्रकाश पवार आदींची उपस्थिती होती.
  यावेळी बोलतांना डॉ. राठोड यांनी सांगितले की, लोकसेवा आयोग परिक्षाचा अभ्यास करताना प्रथम अभ्यासक्रम जाणून घ्यावा व त्यानुसार ग्रंथांची निवडकरुन त्याव्दारे अभ्यास करावा.  ५ ते १० वर्ष जुन्या प्रश्नपत्रिका घेऊन त्या सोडविण्याचा सराव करण्यासोबत रोज किमान १० ते १२  तास अभ्यासाचे पुर्ण नियोजन आवश्यक आहे.  या खेरीज गटचर्चा , चालू घडामोडी , दैनंदिन वृत्तपत्रांचे वाचन याची जोड देवून अभ्यास केला व मेहनत घेतली तर यश प्राप्त करणे अशक्य नाही.   प्रत्येक विषयाला निश्चित वेळ देणे आवश्यक असून  कोणत्याही पध्दतीने ' शॉर्टकट ' ने यश मिळू शकत नाही.  त्यामुळे जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाने अभ्यास महत्वाचा आहे असे डॉ. ओम्बासे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी  यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचे संचालन लंकेश मारगये यांनी केले तर अमित म्हशाखेत्री यांनी आभार प्रदर्शन केले.   यावेळी प्रश्नोत्तरे देखील झाली.  त्यात कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त  सहभाग घेतला.  महिन्यातून किमान २ वेळा असे मार्गदर्शन मिळावे असा सूर  या विद्यार्थ्यांमध्ये होता.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-26


Related Photos