सरकारने घेतला कॉपी प्रकरणांचा धसका : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची अंगझडती घेऊनच परीक्षा केंद्रात प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉपी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा धसका राज्य सरकारनेही घेतला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून विद्यार्थ्यांची अंगझडती घेतल्या नंतरच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीसारखे गैरप्रकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कॉपीमुक्त अभियानाचे सादरीकरण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी केले. अभियानात राज्याचे नोडल अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच समन्वयक अधिकारी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेला अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा पेंद्रांचे वर्गीकरण करावे. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा पेंद्रांवर शक्यतेनुसार व्हिडीओ शूटिंग करण्यात यावे. परीक्षा केंद्रापासून 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. कलम 144 अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात यावेत. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे 100 टक्के विद्यार्थ्यांची झडती घेतली जाणार आहे. मुलांची तपासणी पोलीस पाटील, कोतवाल किंवा शाळेच्या कर्मचाऱ्याकडून केली जाईल तर मुलींची तपासणी अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा शाळेच्या कर्मचारी महिलेकडून केली जाणार आहे.
News - Rajy